आम्हाला नाही का ऑनलाईन शिक्षणाचा अधिकार, कुठलीही सुविधा नाही उपलब्ध

मंगेश गोमासे
शनिवार, 13 जून 2020

कोरोनामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध उपक्रमांची सुरुवात केली. शाळेबाहेरची शाळा आणि दूरदर्शनवर विविध मालिकांचा त्यात समावेश होता. याशिवाय सीबीएसई आणि बहुतांशी इंग्रजी शाळांनी विद्यार्थ्यांना पालकांच्या मोबाईलवरुन व्हिडीओ आणि इतर असाईंमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विषयांची माहिती देण्यात येत आहे. मात्र, दिव्यांग विद्यार्थ्यांना अशा प्रकारची कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून येते.

नागपूर  : टाळेबंदीमुळे देशभरात शाळांद्वारे ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात झाली. सीबीएसई आणि राज्यातील इंग्रजी शाळांद्वारे दररोज नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे राज्यभरातील दिव्यांगावर शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाण्याची वेळ आली आहे.

कोरोनामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध उपक्रमांची सुरुवात केली. शाळेबाहेरची शाळा आणि दूरदर्शनवर विविध मालिकांचा त्यात समावेश होता. याशिवाय सीबीएसई आणि बहुतांशी इंग्रजी शाळांनी विद्यार्थ्यांना पालकांच्या मोबाईलवरुन व्हिडीओ आणि इतर असाईंमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विषयांची माहिती देण्यात येत आहे. मात्र, दिव्यांग विद्यार्थ्यांना अशा प्रकारची कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून येते.

हेही वाचा : ...तर होईल विद्यार्थी, महाविद्यालयांची आर्थिक कोंडी

केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार 21 प्रकारच्या अपंगत्वांचा समावेश दिव्यांगात करण्यात आलेल्या आहेत. यापैकी प्रामुख्याने मुकबधीर, अस्थिव्यंग, मतिमंद, बहुविकलांग आणि अंधत्वाचा समावेश आहे. यासाठी सरकारद्वारे शाळांना मान्यता देत, त्यात विशेष शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

राज्यात जवळपास 800 शाळांचा समावेश असून त्यामध्ये 20 हजारावर शाळा आहेत. या शाळेतून मुकबधीर, अस्थिव्यंग, मतिमंद, बहुविकलांग आणि अंध विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते. मात्र, टाळेबंदीदरम्यान राज्यातील सर्वच शाळा बंद करण्यात आल्यात. यामध्ये दिव्यांगांच्या शाळाही बंद झाल्यात. आता टाळेबंदीदरम्यान अंध, मतिमंद विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष बोलाविणे शक्‍य नसल्याने गेल्या तीन महिन्यांपासून हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेल्याचे चित्र आहे.

सरकारकडूनही बेदखल
राज्य आणि केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आलेत. मात्र, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने कुठलाच उपक्रम यामध्ये दिसून आलेला नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांना नेमके शिकवायचे कसे? हा प्रश्‍न शिक्षकांसमोर पडला आहे.

हेही वाचा : ऑनलाईन शिक्षणाच्या सर्वेक्षणात झाले धक्कादायक खुलासे, नक्की वाचा ही बातमी...

अंध आणि मतिमंद विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविता येत नाही. याशिवाय बरेच विद्यार्थी ग्रामीण आणि शहराबाहेरील असून अनेकांची परिस्थितीही नसल्याचे दिसून येते. त्यामुळे तीन महिन्यांपासून त्यांना शिकविता आलेले नाही.

राजेश हाडके, सहाय्यक अधीक्षक, अंध संरक्षित कर्मशाळा

  • दिव्यांगांच्या शाळा - 800
  • विद्यार्थी - 20,000
  • नागपूर - 100
  • विद्यार्थी - 1600

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disabled students deprived of online education