Video : आयुक्‍त तुकाराम मुंढेंनी कंत्राटी अभियंत्यांना केले निराश, हे आहे कारण...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जून 2020

आयुक्त मुंढे यांनी कंत्राट संपुष्टात येताच या अभियंत्यांना घरचा रस्ता दाखवला. त्यामुळे ऐन कोरोनाच्या काळात या तरुण अभियंत्यांवर बेकारीचे संकट कोसळले. कोरोनाच्या काळात नवीन नोकरी मिळणार नाही. त्यामुळे पुढील सहा महिने मुदतवाढ देण्यात यावी, या मागणीसह 56 अभियंते आयुक्तांच्या दारात पोहोचले. 

नागपूर : महापालिकेने सिमेंट रस्त्यांच्या कामासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या अभियंत्यांना काढून टाकले होते. या अभियंत्यांनी सोमवारी महापालिकेत पुढील सहा महिने मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. मात्र, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांना स्पष्ट नकार दिल्याने त्यांची निराशा झाली. आता मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे एका अभियंत्याने नमूद केले. 

शहरात सिमेंट रस्ता टप्पा तीनच्या कामांसाठी झोनस्तरावर कंत्राटी अभियंत्यांची नियुक्ती केली होती. महापालिकेने दहाही झोनमध्ये एकूण 60 कंत्राटी अभियंत्यांना सहा महिन्यांसाठी नियुक्त केले होते. यातील 56 जणांचा करार 28 मे रोजी संपुष्टात आला. इतर चार जणांच्या कंत्राटाचा करार अद्याप शिल्लक असल्याने ते कायम आहेत. 

हेही वाचा - रस्त्यावर फिरत होत्या आठ तरुणी, पोलिसांनी विचारताच ऐकविली अंगावर काटा आणणारी आपबीती

आयुक्त मुंढे यांनी कंत्राट संपुष्टात येताच या अभियंत्यांना घरचा रस्ता दाखवला. त्यामुळे ऐन कोरोनाच्या काळात या तरुण अभियंत्यांवर बेकारीचे संकट कोसळले. कोरोनाच्या काळात नवीन नोकरी मिळणार नाही. त्यामुळे पुढील सहा महिने मुदतवाढ देण्यात यावी, या मागणीसह 56 अभियंते आयुक्तांच्या दारात पोहोचले. 

या अभियंत्यांनी आयुक्तांना विनंती केली. परंतु, आयुक्तांनी सिमेंट रोडची कामे बंद आहेत. महापालिकेकडे पैशाची चणचण आहे. अशा स्थितीत कंत्राटी अभियंत्यांवर खर्च झेपणारा नाही, असे सांगितले. त्यामुळे या तरुणांची निराशा झाली. आयुक्तांनी कार्यमुक्त केल्याचे कारणही दिले नाही.

अधिक माहितीसाठी - 'लिव्ह इन'मध्ये राहायचे प्रेमीयुगुल; संबंधात अडथळा आल्याने युवक चवताळला अन्‌...
 
मुंबईप्रमाणे तोडगा काढण्याची मागणी

मुंबई महापालिकेनेही अशाच पद्धतीने कंत्राटी अभियंत्यांना अचानक कामावरून कमी केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करून त्यांना पुन्हा कामावर घेतले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असून, मुंबई महापालिकेप्रमाणे तोडगा काढण्याची विनंती त्यांना करण्यात येईल, असेही अभियंत्याने नमूद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disappointment of contract engineers from commissioner