सतत अनुपस्थित राहणारे येणार अडचणीत, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले हे आदेश...

नीलेश डोये
सोमवार, 13 जुलै 2020

कामावर महिनोंमहिने अनुपस्थित राहणाऱ्यांवर आफत येणार आहे. अशा कर्मचाऱ्यांनी यादी तयार करून थेट कारवाई करण्याचे आदेश जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले.

नागपूर : कामावर महिनोंमहिने अनुपस्थित राहणाऱ्यांवर आफत येणार आहे. अशा कर्मचाऱ्यांनी यादी तयार करून थेट कारवाई करण्याचे आदेश जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले. यामुळे अशा कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या विभागप्रमुखांचीही चांगलीच अडचण होणार आहे. 

सीईओ योगेश कुंभेजकर यांनी आज सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. बैठक दीड-दोन तास चालली. सीईओ कुंभेजकर यांनी कर्मचाऱ्यांच्या कामासोबत उपस्थित, अनुपस्थित कर्मचाऱ्यांना आढावा घेतला. बैठकीत अनेक कर्मचारी अनेक महिन्यांपासून कामावर येत नसल्याची बाब समोर आली. यावर त्यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली.

दोषी कर्मचारी आयुक्तालयात ठरतात निर्दोष, वाचा काय आहे प्रकार... 

आतापर्यंत कोणती कारवाई करण्यात आली, या प्रश्‍नावर एकाही विभागप्रमुखांकडून उत्तर आले नाही. त्यामुळे त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. "त्यांना नोकरीची गरज नाही. अशा अनुपस्थितांची यादी तयार करून थेट कारवाई करा', असे आदेश सामान्य प्रशासन विभाग प्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखळेकर यांना दिले.

शिक्षण विभागातील काही शिक्षक निवृत्त होणार असून त्यांनी सुटीचा अर्ज टाकला आहे. या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून कामावर परत बोलावण्याचे निर्देश दिले. कामावर न आल्यास थेट विभागीय चौकशी सुरू करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांना दिले. 

सात दिवसात करा तक्रारींना निपटारा 

जिल्हा परिषदेत अनेक प्रकरण प्रलंबित आहेत. तक्रारींचीही रीघ आहे. प्रलंबित विषयावरही सीईओ कुंभेजकर यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली. प्रकरण प्रलंबित राहता कामा नये, सात दिवसात त्यांचा निपटारा करा आणि पुढच्या आठवड्यात त्यांचा अहवाल सादर करा, असे आदेश त्यांनी दिले. प्रकरण प्रलंबित राहणे चांगले नाही, ते खपवून घेतले जाणार नाही, असा दमही त्यांनी दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disaster to the absent, CEO give this Order