ऐकावे ते नवल... ग्रामीण जनता, शेतकरी, शिक्षण जिल्हा परिषदेतून बेदखल

नीलेश डोये
Monday, 14 September 2020

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुलांचे नुकसान झाले आहे. दळणवळणाचे रस्ते खराब झाले आहेत. पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांवर किडीचा प्रादूर्भाव वाढला आहे. नदीकाठच्या गावात घरांचेही नुकसान झाले आहे. असे असताना अजूनही पंचनामे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले नाही.

नागपूर  : जिल्हा परिषद ग्रामीण भागातील विकासाचे केंद्रबिंदू मानले जाते. ग्रामीण भागातील जनता, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होऊन ते मार्गी लागण्याची अपेक्षा असते. पुरामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीन व कापूस पिकाचीही हानी झाली. जिल्ह्यातील शेतकरी या नुकसानीमुळे चिंतित आहेत.  या विषयांकडे दुर्लक्ष करून सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केवळ बांधकम आणि पंचायत विभागाशी संबंधित विषयांवर चर्चा झाली. त्यामुळे जनतेसोबत शेतकरीही जिल्हा परिषदेत बेदखल असल्याची चर्चा रंगली आहे.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुलांचे नुकसान झाले आहे. दळणवळणाचे रस्ते खराब झाले आहेत. पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांवर किडीचा प्रादूर्भाव वाढला आहे. नदीकाठच्या गावात घरांचेही नुकसान झाले आहे. असे असताना अजूनही पंचनामे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले नाही. एकीकडे कोरोनामुळे ग्रामीण भागात हाहाकार माजला आहे. 

हेही वाचा - वीज ग्राहकांनो लक्ष द्या! अचूक वीजबिल हवंय? मग ५ दिवसांच्या आत हे कराच.. अन्यथा..
 

अशात लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्यांच्या बाबतीत आग्रही भूमिका घेऊन बैठकांमधून त्यावर कशी मात करता येईल. जनतेला दिलासा देण्यासाठी काय उपाययोजना करता येईल. यावर चर्चा होणे, त्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला पाठविणे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असताना, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत निव्वळ स्वत:च्या हिताच्या विषयावर चर्चा करण्यात येते. 

दोन तास चाललेल्या या बैठकीत फक्त एकच मिनिट शेतकऱ्यांना देण्यात आल्याची माहिती आहे. झालेल्या नुकसानीचीही साधी माहितीही घेण्यात आली नाही. शाळा सुरू होणार आहे. ऑनलाईन शिक्षणाचा साधा आढाही घेण्यात आला नाही. अध्यक्षांनी बैठकीत दुरूस्तीचे प्रस्ताव तत्काळ पाठविण्याचे निर्देश दिले आहे. यावरून ग्रामीण भागाबद्दल लोकप्रतिनिधी किती गंभीर आहे, हे दिसून येते.

 
योग्य निर्णय घेण्यात येतील
बैठक आॅनलाईन घेण्यात आली. तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे अनेक विषयांवर चर्चा करता आली नाही. शासनाकडून मदत देण्यात येत असून त्यांच्याकडून योग्य निर्णय घेण्यात येतील.
रश्मी बर्वे, अध्यक्ष

 
आरोग्याबाबत सत्ताधारी गंभीर नाही
आरोग्याबाबत सत्ताधारी गंभीर नाहीत. शेतकऱ्यांचा प्रश्न मांडू दिला नाही. मी मुद्दा मांडला की अवंतिका लेकुरवाडेंना समोर करून विषय भरकविण्यात येते. यांना घोटाळ करण्यापासून वेळ नाही. अनिल निधान, विरोधी पक्ष नेते.
 

संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion only on Panchayat, construction in Zilla Parishad Standing Committee meeting