दारूचा ग्लास कमी भरल्याच्या कारणावरून नागपूरच्या या भागात झाला राडा

अनिल कांबळे
गुरुवार, 18 जून 2020

अनिल आणि रामलखन हे दोघेही घरासमोर असलेल्या रिकाम्या जागेवर अंधारात दारू पिण्यास बसले होते. दोघांनीही एक बाटली दारू ढोसली. त्यानंतर अनिलने पुन्हा एक बाटली आणली.

नागपूर : दोन मित्र दारू पित बसले होते. दारू पिताना एका ग्लासात कमी दारू भरल्यामुळे दोघांत वाद झाला. या क्षुल्लक कारणावरून दोघांनी एकमेकांना मारहाण केली. मात्र, एकाने दुसऱ्याला लाकडी दांड्याने आणि दगडाने ठेचून ठार केले. ही थरारक घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजता बेलतरोडीत घडली.

रामलखन सुखरू पाल (वय 45, रा. निरंजननगर,ममता सोसायटी) असे खून झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. गेल्या चोवीस तासात उपराजधानीत कळमना आणि बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्‌दीत दोन हत्याकांड उघडकीस आले आहेत. आरोपी अनिल सुखदेव मेश्राम (35, बजरंगनगर, अजनी) आणि रामलखन पाल हे दोघेही मजूर आहेत. सोबतच बांधकामावर मिस्त्रीच्या हाताखाली कामावर जात होते. दोघांनाही दारूचे व्यसन होते. त्यामुळे आठवड्यातून दोन-तीनदा ते दारू ढोसण्यासाठी एकत्र बसत होते.

अवश्य वाचा : नागपूर आता क्राईम कॅपिटल राहिले नाही, गुन्ह्यांचे प्रमाण एवढ्या टक्क्यांनी घटले

नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री साडेनऊ वाजता अनिल आणि रामलखन हे दोघेही घरासमोर असलेल्या रिकाम्या जागेवर अंधारात दारू पिण्यास बसले होते. दोघांनीही एक बाटली दारू ढोसली. त्यानंतर अनिलने पुन्हा एक बाटली आणली. रामलखन याने दोघांचेही ग्लास भरले. मात्र, अनिलच्या ग्लासात दारू कमी भरली. त्यामुळे "दोस्ती में दगाबाजी करता हैं' असे म्हणून अनिलने त्याला शिवीगाळ केली. दोघांत चांगलीच हाणामारी झाली. शेवटी अनिलने लाकडी दांड्याने रामलखनवर हल्ला केला. तो खाली पडल्यानंतर त्याच्या डोक्‍यात दगड घातला आणि पळून गेला. पहाटेच्या सुमारास हे हत्याकांड उघडकीस आले. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली.
 
पटले हत्याकांड : चार आरोपी अटकेत
कळमन्यातील कुख्यात गुंड आणि तडीपार आरोपी नितेश पटले हत्याकांडात कळमना पोलिसांनी चोवीस तास चार आरोपींना अटक केली. लोकेश विरसिंग शाहू (वय 23, भगतनगर), गणू उर्फ गोलू चिंतामन सेलोकर (वय 24, भगत नगर), सुनील छबीलाल उपवंशी (वय 20) आणि हेमकुमार उर्फ गोलू प्रभूकुमार हेमनानी (वय 24, भगत नगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. हे हत्याकांड वस्तीतील रंगदारी आणि वर्चस्वातून झाले आहे. नितेश पटले हा कुख्यात गुंड असून वस्तीत रंगदारी करीत अन्य गुन्हेगारांवर वर्चस्व गाजवित होता. त्यामुळे प्रतिस्पर्धी टोळी नितेशचा गेम करण्यासाठी सज्ज होती. नितेश केवळ दहा दिवसांपूर्वीच मध्यवर्ती कारागृहातून सुटून बाहेर आला होता. हीच संधी साधून लोकेश शाहूने नितेशचा "खेळ खल्लास' केला. त्यामुळे आता वस्तीत गॅंगवॉर भडकण्याचे चिन्हे दिसत आहेत.

नागपूरच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

मुख्य आरोपीचे घर पेटविण्याचा प्रयत्न
कुख्यात नितेश पटले यांचा गेम केल्यामुळे प्रतिस्पर्धी टोळीतील युवक चिडून आहेत. त्याचाच परिपाक म्हणून नितेश हत्याकांडातील मुख्य आरोपीच्या घरावर काही युवकांनी अचानक हल्ला केला. आरोपीचे घर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कळमना पोलिस वेळीच पोहचल्यामुळे अनर्थ टळला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dispute among two friends over liquor peg