सांगा मायबाप सरकार जगायचे कसे? ऍनलॉनंतरही मोलकरणींसाठी दरवाजे लॉक

केवल जीवनतारे
शुक्रवार, 26 जून 2020

वर्षांनुवर्षे घरकामगार महिलांचा अविरत जगण्याचा आणि जगवण्याचा हा प्रवास सुरू आहे. मात्र, अचानक कोरोनाच्या रूपानं आलेल्या महासंकटानं यांनाही खोलीबंद केलं. केवळ भीतीपोटी घरकामगार महिलांसाठी मार्च महिन्यापासून बंगल्याचे, फ्लॅटचे, नव्हेतर साऱ्यांच्याच घरांचे दरवाजे बंद झाले आहेत.

नागपूर : कविता शेंडे ः कोरोना काय आहे, हे माहीत नाही भाऊ, परंतु साऱ्यायनं आमच्या जिंदगीचा खेळ मांडला. कोरोनानं नाही तर आमच्यावर भुकेच्या वेदनेनं मराची वेळ आली आहे. कधीकाळी कॉंग्रेस सरकारने आमाले जगवण्यासाठी सन्मान, धन दिलं होतं. आता या संकटात आमी जगायचे कसे?

कांता मडामे ः पोटभर जेवून ढेकर देणाऱ्या नोकरदारांच्या खूप संघटना आहेत. त्यायचे आंदोलन झाले की, सरकार झुकते. आमी त्यांच्या घरी काम करतो, उष्टी खरकटी भांडी धुतो, तीन महिने घरी येऊ नका मनलं...नाही आलो, आता सारं सुरू झालं. पण आम्ही लेकरं जगवायची कशी? त्यांना सारे भत्ते मिळततं. आम्हा मोलकरणींचं काय?

वाचा- सततच्या आर्थिक तणावातून सलून व्यावसायिकाने घेतला टोकाचा निर्णय

या भावना आहेत, शहरातील घर कामगार महिलांच्या. सूर्य उगवण्यापूर्वीच पहिला बंगला जवळ करतात. एका बंगल्यातील धुणीबांडी आटोपली की, दुसऱ्या फ्लॅट सिस्टिममध्ये. तेथे झाडू पोछा झाला की, लगेच तिसरे घर ती जवळ करतात. पायाला चाकं लावल्यासारखे या घरून त्या घरी धावत दिसतात.

वर्षांनुवर्षे घरकामगार महिलांचा अविरत जगण्याचा आणि जगवण्याचा हा प्रवास सुरू आहे. मात्र, अचानक कोरोनाच्या रूपानं आलेल्या महासंकटानं यांनाही खोलीबंद केलं. केवळ भीतीपोटी घरकामगार महिलांसाठी मार्च महिन्यापासून बंगल्याचे, फ्लॅटचे, नव्हेतर साऱ्यांच्याच घरांचे दरवाजे बंद झाले. आपल्या पिलांना काय खाऊ घालावं, हा सवाल घेऊन बिच्चाऱ्या जगतानांही मरणयातना भोगत आहेत.

नागपूर आणि कामठी परिसरात सुमारे एक लाखावर घरकामगार महिला आहेत. बहुतांश इमारती, फ्लॅटधारकांच्या सोसायटीमध्ये सुरक्षेचे कारण पुढे करत घरमालकांनी घराचे दरवाजे बंद केले. घरात नव्हेतर सोसायटीतील प्रवेश नाकारला. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते, याकडे साऱ्यांनीच दुर्लक्ष केले.

घरकामगार महिलांना घरमालकांनी महिन्याचे वेतन द्यावे अशी विनवणी विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे करण्यात आली. मात्र, या आवाहनाला घरमालकांनी दाद दिली नाही. लॉकडाउनच्या काळात शंभरातून दहा घरमालकांनीच मोलकरणींना महिन्याचे वेतन दिले असावे. तर काहींनी अर्धे वेतन कापून दिले. आता लॉकडाउन संपून महिना होत आहे. सर्वत्र ऍनलॉक झाले. मात्र, अद्यापही मोलकरणींसाठी घरमालकांनी आपल्या घराचे दरवाजे उघडले नाही. ज्यांचे पोट हातावर आहे, त्यांची सामाजिक सुरक्षा सरकारने कशी करता येईल, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

मोलकरणींचे पोट हातावर आहे. अनेकींच्या कपाळावर कुंकू नाही. लेकरांना जगवण्यासाठी त्यांनी हा मार्ग स्वीकारला. काहींचे पती व्यसनी आहेत. लहान मुले आहेत. त्यांचे शिक्षण, घरखर्च आहे. घरकाम बंद झाल्याने हातात पैसा नाही. काम हातातून जाणार तर नाही ना, याची चिंता आहे. या घरकामगार महिलांना सरकारने सन्मानधन म्हणून दहा हजार रुपये द्यावे.
विलास भोंगाडे, विदर्भ मोलकरीण संघटना, नागपूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distress life of maid due to corona