नागरिकांनो, यंदा दिवाळीत फटाके फोडू नका; नागपूर पालिकेचे आवाहन; फटाका दुकानदार चिंतेत 

राजेश प्रायकर 
Sunday, 8 November 2020

दिल्लीत फटाक्यांवर बंदी लावण्यात आल्यानंतर राज्यातही याबाबत चर्चा सुरू झाली. अनेक पर्यावरणप्रेमींनी प्रदूषण टाळण्यासाठी फटाक्यांवर बंदीची मागणी केली.

नागपूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाने नुकताच कोरोनामुक्त झालेल्यांना त्रास होण्याची भीती व्यक्त करीत राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महापालिकेनेही फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीत फटाके बंदीनंतर शहरातील पर्यावरणप्रेमींनीही फटाक्यांवर बंदी लावण्याची गरज व्यक्त केली. परिणामी नुकताच लावण्यात आलेल्या फटाका दुकानांवर बंदीची टांगती तलवार असल्याचे दिसून येत आहे.

दिल्लीत फटाक्यांवर बंदी लावण्यात आल्यानंतर राज्यातही याबाबत चर्चा सुरू झाली. अनेक पर्यावरणप्रेमींनी प्रदूषण टाळण्यासाठी फटाक्यांवर बंदीची मागणी केली. त्यातच कोरोनातून नुकताच बरे झालेल्यांना तसेच बाधितांनाही फटाक्यांच्या प्रदुषणाचा त्रास होण्याची भीती व्यक्त करीत राज्य सरकारने दिवाळीनिमित्त काढलेल्या मार्गदर्शक तत्त्वात फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे. महापालिकेनेही राज्य सरकारचीच री ओढली. 

हेही वाचा - पदवीधर निवडणुक: काँग्रसचं ठरलं, भाजपचं अजूनही गुलदस्त्यात; अभिजित वंजारी सोमवारी अर्ज दाखल करणार

एकीकडे पर्यावरणप्रेमींचा दबाव, बाधितांना वायूप्रदूषणाचा वाढता धोका बघता फटाका दुकानांवर बंदी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरात यंदा मागील वर्षीच्या तुलनेत फटाक्यांची दुकाने कमी आहेत. या दुकानांना परवानगी देताना महापालिकेच्या अग्निशमन विभागाने कोरोनामुळे अनेक अटी लादल्या आहेत. शहरात ५८२ दुकानांना परवानगी देण्यात आल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांंनी नमुद केले. 

मागील वर्षी ७५२ दुकानांना परवानगी देण्यात आली होती. दुकानात गर्दी करू नये, सॅनिटायझरचा वापर आदी अटींसह दुकानांना परवानगी देण्यात आली. अनेकांनी दुकाने लावली असून फटाक्यांची खरेदीही केली. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा, पर्यावरणप्रेमींचा विरोध बघता शहरातील दुकानांंवर बंदी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गर्दीच्या ठिकाणी नाकारली परवानगी

सीताबर्डी, महाल, गांधीगेट चौक, भोसला वाडा, बडकस चौक, कल्याणेश्वर मंदिर परिसर, गोळीबार चौक, टिमकी, तीननल चौक, शहीद चौक, टांगा स्टँड, हंसापुरी, नालसाब चौक, मस्कासाथ, नेहरू पुतळा, मारवाडी चौक, मेयो रुग्णालय परिसर, डागा रुग्णालय, मेडिकल कॉलेज परिसर, इंदोरा चौक, कमाल टॉकीज चौक, गोकुळपेठ बाजार, सदर रेसिडेन्सी रोड तसेच गर्दीच्या ठिकाणी दुकाने लावण्यास अग्निशमन विभागाने परवानगी नाकारली.

गर्दीच्या ठिकाणी दुकानांना परवानगी नाकारण्यात आली आहे. ज्या दुकानांना परवानगी देण्यात आली. त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी पाळण्यास स्पष्टपणे निर्देश देण्यात आले. १५ दिवसांकरिता ४५० किलोग्रॅम पर्यंतचे फटाका विक्रीसाठी परवानगी दिली आहे. यासाठी अग्निशमन विभागाद्वारे सूचविण्यात आलेल्या उपाययोजनांचे व कोव्हीड - १९ संबंधी शासनाचे दिशा-निर्देशाचे पालन करणे बंधनकारक आहे.
- राजेंद्र उचके, 
मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका.

अधिक वाचा - शेतातील पडक्या खोलीतून येत होती दुर्गंधी; मित्राच्या सांगण्यावरून जाऊन बघितले असता आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

फटाक्यांचा धूर आणि धुके एकत्र आल्यास ‘स्‍मॉग' तयार होते. स्मॉगमुळे कोरोनाचा विषाणू वातावरणातील थरावर जास्त वेळ राहू शकतो. त्यामुळे फटाक्यांवर बंदी आवश्यक आहे. सध्या ग्रीन फटाक्यांची क्रेज आली आहे. परंतु हे फटाकेही ७० टक्के प्रदूषण पसरविण्यास मदत करतात. या फटाक्यांमुळे पर्यावरणाला नुकसान पोहोचत नाही, हा केवळ गैरसमज आहे.
- कौस्तुभ चॅटर्जी, 
संस्थापक अध्यक्ष, ग्रीन व्हिजिल संस्था.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not burn Fire crackers Nagpur NMC Appeal to people