काय म्हणावे याला! लसीकरण केंद्र सुरू, पण डॉक्टरच गायब! आजारांनी ग्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची होरपळ

doctor not present on corona vaccination center in nagpur
doctor not present on corona vaccination center in nagpur

नागपूर : शहरातील अनेक भागात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. परंतु, अनेकदा डॉक्टरच गायब होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना तासभर ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ठरवून दिलेले दिवसाला ४० हजार लसीकरणाचे लक्ष्य कसे पूर्ण होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यानिमित्त लसीकरणाबाबत महापालिकेच्या गांभीर्यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. 

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सलग दोन दिवस बैठका घेऊन लसीकरण मोहीम युद्धस्तरावर घेण्याचे निर्देश दिले. शहरातही महापौर दयाशंकर तिवारी यांनी ११ लसीकरण केंद्र वाढविण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले. कोरोनावर नियंत्रणासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत आहे. परंतु, जबाबदार डॉक्टरच बेजबाबदारपणे वागत असल्याची प्रचिती नुकताच इंदोरा केंद्रावर आली. शुक्रवारी इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ९ वाजतापासून ज्येष्ठ नागरिक आणि विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांनी लसीकरणासाठी येणे सुरू केले होते. परंतु, याठिकाणी डॉक्टरच उपलब्ध नसल्याने तब्बल तासभर ज्येष्ठ नागरिकांनी ताटकळत राहावे लागले. यासंदर्भात महापौर दयाशंकर तिवारी यांना माहिती देण्यात आली. परंतु, त्यांनी कुठलीच दखल घेतलेली नाही. त्यानंतर आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी तासभरानंतर डॉक्टरांची पर्यायी व्यवस्था केली. त्यानंतर लसीकरणाला सुरुवात झाली. या केंद्रावर ६० वर्षावरील नागरिकांचे लसीकरण तर सुरू झाले. अशीच स्थिती अनेक केंद्रावर असल्याचे एका केंद्रावरील कर्मचाऱ्याने नमुद केले. एकीकडे लसीकरण केंद्र वाढविले जात असताना आवश्यक कर्मचारी, डॉक्टरांचीच नियुक्त होत नसल्याने नागरिकांची होरपळ सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

आजाराचे प्रमाणपत्र देऊनही प्रतीक्षा -
ऑनलाइन नोंदणीसाठी लसीकरण केंद्रांवर वेगळी रांग लावण्यात येत आहे. यात ४५ ते ५९ पर्यंत वयोगटातील नागरिकही रांगेत दिसून येतात. विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या या नागरिकांनी डॉक्टरांचे रोगाचे प्रमाणपत्र आणल्यानंतरही त्यात अनेक शंका विचारून नागरिकांनाच उन्हात घाम फोडला जात असल्याचे दिसून येत आहे. 
अनेक लसीकरण केंद्रात डॉक्टर नसल्याने परिचारिकांनाच महत्त्व आले आहे. परंतु, त्यांच्याकडून सौजन्याची अपेक्षाच ठेऊ नये, असे अनुभव ज्येष्ठ नागरिकांना आले. अनेक ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाबाबत माहिती नसते. त्यामुळे ते परिचारिकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु, एकच माहिती किती वेळा सांगायची, असे म्हणत या परिचारिका नागरिकांना टाळत असल्याचेही चित्र आहे. 
 
चाचणी केंद्र दोनच तास -
चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. परंतु, बाबुळखेडा येथील महापालिकेचे चाचणी केंद्र केवळ दोनच तास सुरू असल्याची माहिती या परिसरातील नागरिकांनी सांगितले. मुळात चाचणी केंद्र दोन वाजेपर्यंत सुरू असते. परंतु, येथे केवळ दोनच तास सुरू असल्याने अनेक नागरिकांना चाचणी न करताच परत जावे लागत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com