डॉन आंबेकरचे पैसे प्रॉपर्टीत गुंतवणार कोण? वाचा काय झाले...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

कृष्णा हा "व्हाइट कॉलर' गुन्हेगार आहे. आंबेकरचे पैसे प्रॉपर्टीत गुंतविण्याचे काम त्याच्याकडे आहे. आंबेकरच्या पैशातूनच त्याने अकोला येथे अनेक फ्लॅट स्किम बांधल्या आहेत. कृष्णा याला पहिल्यांदाच अटक झाली. 

नागपूर : कुख्यात डॉन संतोष आंबेकरच्या अकोला आणि मुंबईतील दोन गॅंगस्टर्सला गुन्हे शाखेने शिताफीने सापळा रचून अटक केली. या दोघांच्याही अटकेमुळे गुन्हेगारी जगताला मोठा हादरा बसला आहे. कृष्णा थोटांगे (रा. अकोला) व जगन जगदाळे (रा. घाटकोपर, मुंबई), अशी आरोपींची नावे आहेत. दोघांची 10 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आंबेकर व त्याच्या साथीदारांविरुद्ध आतापर्यंत खंडणी, धमकी, भूखंडावरील ताबा घेणे व अत्याचारासह 13 गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी आंबेकर व त्याच्या साथीदारांविरुद्ध मकोकाअंतर्गत कारवाई केली आहे. गुन्हेशाखा पोलिसांनी आंबेकर, त्याचे दोन भाचे, मावस भाऊ, सराफा राजा अरमरकरसह 12 पेक्षा अधिक जणांना अटक केली आहे. सर्वजण सध्या कारागृहात आहेत. 

कृष्णा व जगनसह आंबेकर याचे अन्य साथीदार फरार होते. बुधवारी पोलिसांनी कृष्णा याला अटक केली. न्यायालयात हजर करून त्याची 10 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली. गुरुवारी जगन यालाही अटक करून त्याचीही पोलिस कोठडी घेण्यात आली. तसेच डॉन आंबेकरने एका डॉक्‍टर तरुणीवर आणि 17 वर्षाच्या मुलीच्या डोक्‍याला पिस्तूल लावून बलात्कार केल्याचाही गुन्हा दाखल आहे. 

काय आहे या लिंकमध्ये? - हॅलोऽऽ हॅलोऽऽ, तुकाराम मुंढे यांच्या तावडीतून कसे सुटायचे, सांगता का?

कृष्णा हा "व्हाइट कॉलर' गुन्हेगार आहे. आंबेकरचे पैसे प्रॉपर्टीत गुंतविण्याचे काम त्याच्याकडे आहे. आंबेकरच्या पैशातूनच त्याने अकोला येथे अनेक फ्लॅट स्किम बांधल्या आहेत. कृष्णा याला पहिल्यांदाच अटक झाली. मुंबईत भूखंड मिळवून देण्याच्या बहाण्याने आंबेकर व त्याच्या साथीदारांनी गुजरातमधील एका व्यापाची पाच कोटींनी फसवणूक केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 12 ऑक्‍टोबरला गुन्हेशाखा पोलिसांनी आंबेकरला अटक केली होती. याचप्रकरणात पोलिसांनी आंबेकर व त्याच्या साथीदाराविरुद्ध मकोकाअंतर्गत कारवाई केली. मकोकाअंतर्गतच कृष्णा व जगनलाही अटक करण्यात आली. 

ऑटोचालक ते गॅंगस्टर

मुंबईतील जगन जगदाळे ऑटोचालक असून, नाशिक कारागृहात त्याची डॉन आंबेकर याच्यासोबत ओळख झाली. आंबेकरने त्याला टोळीत सामिल करून घेतले. मुंबईतील व्यापाऱ्यांना कमी किमतीत सोन्याचे बिस्कीट मिळवून देण्याचे आमिष जगन दाखवयाचा. व्यापाऱ्यांना नागपुरात आणून जगन हा त्यांची आंबेकरसोबत भेट घालून द्यायचा. त्यानंतर आंबेकर ठार मारण्याची धमकी देऊन व्यापाचे पैसे हडपत होता. ऑटोचालक जगन आज कोट्यवधीचा मालक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don Ambaker's two gangsters arrested