पॅरोल रजेवर गेलेल्या कुख्यात डॅडीलाच नाकारला प्रवेश, कारागृह प्रशासनालाही कोरोनाची धास्ती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

मुंबईतील तळोजा कारागृह प्रशासनासमोर शरण गेलेल्या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला कारागृह प्रशासनाने प्रवेश नाकारला. कारागृहातील इतर कैद्यांना कोरोना आजाराचा संसर्ग होण्याचा धोका असल्यामुळे गवळीला होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला तळोजा प्रशासनाने दिला,

नागपूर  : कोरोनाची दहशत तुरुंग प्रशासनातही पसरली आहे. हे चक्क पँरोल रजेवर गेलेल्या डाँन अरुण गवळी या कैद्याला प्रवेश नाकारण्याने सिध्द झाले.
मुंबईतील तळोजा कारागृह प्रशासनासमोर शरण गेलेल्या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला कारागृह प्रशासनाने प्रवेश नाकारला. कारागृहातील इतर कैद्यांना कोरोना आजाराचा संसर्ग होण्याचा धोका असल्यामुळे गवळीला होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला तळोजा प्रशासनाने दिला, अशी माहिती अरुण गवळी याचे वकील मीर नगमान अली यांनी दिली.
पॅरोल रजेमध्ये वाढ मिळावी म्हणून दुसऱ्यांदा अर्ज करणाऱ्या गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे. 24 मे रोजी त्याची पॅरोल रजा संपल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तो तळोजा कारागृहामध्ये शरण गेला होता. त्यामुळे, रजा वाढवून मिळावी म्हणून 29 मे रोजी गवळी पुन्हा उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याची माहिती ऍड. मीर नगमान अली यांनी दिली. पत्नी आजारी असल्याने 13 मार्च रोजी अरुण गवळी याला 45 दिवसांची पॅरोल रजा मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर, लॉकडाऊन लागू झाल्याने 28 एप्रिल रोजी त्याला 10 मे पर्यंत पुन्हा पॅरोल रजा मंजूर करण्यात आली होती.

सविस्तर वाचा - वेळ रात्री अकराची...युवतीसोबत रस्त्यावर बोलत होता पोलिस कर्मचारी...मग काय झाले वाचा...
दरम्यान, लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने त्याने 8 मे रोजी रजा वाढवून मिळावी या विनंतीसह न्यायालयात पुन्हा अर्ज दाखल केला होता. त्यानुसार, 24 मे पर्यंत पॅरोल रजा वाढवून देण्यात आली होती. ही रजा संपत आल्याने गवळी याने गुरुवारी (ता. 21) तिसऱ्यांदा पॅरोलसाठी अर्ज केला होता. मात्र, त्याचा हा विनंती अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळत त्याला मुंबई येथील तळोजा कारागृह प्रशासनाकडे शरण येण्याचे आदेश दिले होते. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याला 20 मे 2008 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानुसार, तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don Arun Gawali rejected permission in prison while on parol