रस्त्यांवर थुंकणाऱ्यांनो सावधान! तुमच्यावर आहे नजर...

spitting
spitting

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता राहावी, यासाठी सर्वस्तरावर जनजागृती होत असताना काही नागरिक मात्र सवयी सोडण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. आज अशा नागरिकांना महापालिकेने दंडातून धडा शिकवला. रस्त्यांवर थुंकणाऱ्या दुचाकीधारक, चारचाकीतील नागरिकांकडून पाच हजार दंड वसूल करीत मनपाच्या उपद्रव शोध पथकाने त्यांना चांगलेच फटकारले.

महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात धरमपेठ आणि मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाच्या चमूने आज संविधान चौकात कारवाई केली. शहरातील रस्त्यांवर थुंकल्याने संसर्गजन्य रोगाचा प्रसार अधिक होतो. त्यातच सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने शहरातील प्रशासकीय यंत्रणा याबाबत अधिक सतर्क आहे. थुंकणाऱ्या व्यक्तींवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी मनपाच्या उपद्रव शोध पथकाने कंबर कसली आहे. बस, ऑटोमधील व्यक्ती रस्त्यांवर थुंकताना आढळून आले. मध्यप्रदेश परिवहन मंडळाच्या बसमधील प्रवासी, स्टार बसमधील प्रवासी, ऑटो चालक, कार चालक, ट्रकचालक अशा विविध व्यक्तींनी रस्त्यावर थुंकल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करीत प्रति व्यक्ती 200 रुपये याप्रमाणे 4600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

गाडीतूनच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या चार व्यक्तींवरही पथकाने कारवाई केली. प्रति व्यक्ती 100 रुपये प्रमाणे त्यांच्याकडून 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दोन्ही कारवाईतून एकूण पाच हजार रुपये उपद्रव शोध पथकाने वसूल केले. 1 ते 18 मार्चपर्यंत थुंकणाऱ्या 204 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 40 हजार रुपयांची दंडाची रक्कम वसूल करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com