पालकांनो, मुलांना द्या स्वच्छतेची घुटी 

केवल जीवनतारे 
सोमवार, 13 जुलै 2020

मुलांना आता खऱ्या अर्थाने स्वच्छतेची घुटी देण्याची जबाबदारी पालकांनी स्वीकारायची आहे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अनिवाश गावंडे यांनी स्वच्छतादिनानिमित्त केले.

नागपूर : स्वच्छता राखल्यास पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जास्त साथीचे आजार दूर पळतात. आरोग्याचे सौंदर्यशास्त्र म्हणून मुलांना स्वच्छतेचे बाळकडू पाजण्यासाठी पालकांनी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा केला की, सर्वांगीण आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या मार्गात अडथळे येतात. मुलांना आता खऱ्या अर्थाने स्वच्छतेची घुटी देण्याची जबाबदारी पालकांनी स्वीकारायची आहे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अनिवाश गावंडे यांनी स्वच्छतादिनानिमित्त केले. 

पावसाबाबत प्रादेशिक हवामान विभागाने दिला इशारा, वाचा काय होणार...
 

दररोज सकाळी अंथरुणातून उठल्यानंतर व रात्री झोपताना किमान तीन मिनिटे दात स्वच्छ घासले पाहिजेत. हात धुतले पाहिजेत. सकाळ उठल्यानंतर हाताने जीभ नियमितपणे स्वच्छ केली पाहिजे. मुलांना चांगल्या सवयी कशा लागतील याचा ध्यास पालकांनी घ्यावा. स्वच्छतेचे प्रशिक्षण देण्याआधी स्वच्छता का ठेवावी याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. कारण, स्वच्छता पाळल्यास आजार पसरण्यापासून प्रतिबंध करता येऊ शकतो. 

हात धुण्यातून करता येते अनारोग्यावर मात 
पावसाळ्यात घरी कूलरमध्ये, अडगळीत पडलेल्या सायकलच्या टायरमध्ये पाणी साचते. डास तयार होतात. डासांपासून मलेरिया, डेंगीसह इतरही आजार होतात. सॅनिटायझरचा वापर आणि चेहऱ्यावर मास्क बांधण्यासंदर्भातील प्रशिक्षण देण्याची जबाबदारी पालकांनी पार पाडावी. अंघोळ करतेवेळी पोट, हात, पाय साबणाने योग्यरित्या का स्वच्छ करावे, यासंदर्भात संपूर्ण मागदर्शन पालकांनी केल्यास मुलांना स्वच्छतेच्या सवयी लागतील, असा दावा डॉ. अविनाश गावंडे यांनी केला. 

 

खोकताना, शिंकताना घ्या काळजी 

अनारोग्य पसरण्याचा मार्ग म्हणजे मुख आहे. दात घासण्याची पद्धत मुलांना करून दाखवावी. याशिवाय खोकणे आणि शिंकण्यातून कोरोनासारख्या जंतूचा प्रसार गतीने होतो. खोकताना, शिंकताना, नाक आणि तोंडासमोर रुमाल धरावा, असा सल्ला डॉ. गावंडे यांनी दिला. 

 

आहाराबाबत मुलांना सांगावे
नखे खाण्याची, ती कुरतडण्याची सवय मुलांमध्ये असते. नखांत धूळ आणि जंतू साठले असतात. मुले नखं कुरतडतात, तेव्हा जंतू पोटात जातात. याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो. आहाराबाबत मुलांना सांगावे. मुलांनी जेवण करताना हात स्वच्छ धुवावे. भरवताना चमच्याचा वापर करावा; जेणेकरून जंतूंचा संपर्क कमी होईल. 
-डॉ. अविनाश गावंडे, बालरोगतज्ज्ञ, नागपूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Avinash Gawande gave information about cleanliness