डॉ. आंबेडकर रुग्णालयात खाटांची क्षमता ६१५वर, अतिविशेषोपचारही दिले जाणार

केवल जीवनतारे
Wednesday, 16 December 2020

या रुग्णालयाचा लाभ सुमारे दोन कोटी लोकांना होईल. १ हजार २० कोटी रुपये खर्चून होणाऱ्या श्रेणीवर्धनाच्या प्रस्तावाला वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडून हिरवी झेंडी मिळाली असून आता सामाजिक न्याय विभागाच्या दालनात हा प्रस्ताव आहे. 

नागपूर : उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान व संशोधन केंद्राचा विस्तार सुरू करण्यात आला आहे. ५६८ वरून खाटांची क्षमता आता ६१५ वर गेली असून रुग्णालयात सुमारे १९ सामान्य विभागासह ११ अतिविशेषोपचार दर्जाचे उपचार रुग्णालयात उपलब्ध होतील. 

हेही वाचा - वाघ बघायचाय? पेंच- ताडोब्यात होतेय हमखास दर्शन; ही आहे...

उत्तर नागपुरात ११ माळ्यांच्या इमारतीमध्ये डॉ. आंबेडकर रुग्णालय व अतिविशेषोपचार दर्जाच्या रुग्णालयाचे नियोजन सध्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अखत्यारीत अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया आणि डॉ. आंबेडकर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवि चव्हाण श्रेणीवर्धनाच्या कामाकडे लक्ष देत आहेत. अतिविशेषोपचारात हृदयरोग चिकित्सा, हृदयरोग शल्यक्रिया, मेंदूरोग, मेंदूविकार शल्यक्रिया, बालरोग, पोटाशी निगडीत आजारांसाठी गॅस्ट्रो इंट्रॉलॉजी, बालरोग, हिमॅटोलॉजीसह इतरही विभाग सुरू होणार आहेत. इतर सामान्य विभागांमध्ये मेडिसिन, अस्थिरोग, कान-नाक- घसा, स्त्रीरोग प्रसूतिशास्त्र, बालचिकित्सा, लॅबरॉटरी मेड़िसिन, मायक्रो बायोलॉजी, पॅथॉलॉजी, मानसोपचार, भूलतज्ज्ञ, मूत्रविकार, अपघात विभाग, सर्जिकल कॅज्युअल्टी, श्वसनविकार अशा १९ शाखांचे स्वतंत्र विभाग रुग्ण सेवेत रुजू होणार आहेत. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी ९१५ कोटी बांधकामावर खर्च होणार आहेत. या रुग्णालयाचा लाभ सुमारे दोन कोटी लोकांना होईल. १ हजार २० कोटी रुपये खर्चून होणाऱ्या श्रेणीवर्धनाच्या प्रस्तावाला वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडून हिरवी झेंडी मिळाली असून आता सामाजिक न्याय विभागाच्या दालनात हा प्रस्ताव आहे. 

हेही वाचा - Big Breaking : वाढदिवस साजरा करायला गेले, पण वाटतेच...

श्रेणीवर्धनामुळे मेयोतून वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. श्रेणीवर्धन पूर्ण झाल्यानंतर मेयोतील पदव्युत्तर आणि अतिविशेषोपचार शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जागांमध्येही वाढ होईल. ११ अतिविशेषोपचार शाखांमुळे पदव्युत्तर शाखेतील सामान्य विभागात ७० आणि अतिविशेषोपचार शाखेतील ४० जागांमध्ये वाढ होणार आहे. 
-डॉ. रवि चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र, नागपूर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr babasaheb hospital has 615 beds capacity in nagpur