esakal | लॉकडाऊनमुळे अडकल्या, पोलिसांचा मारही खाल्ला, एक देवदूत भेटला आणि... 
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Nilesh Bharne showed the way home nine young women in lockdown

मध्य प्रदेशातील बालाघाट शहरात राहणाऱ्या नऊ तरुणी तामिळनाडूतील तिरपूर जिल्ह्यात असलेल्या इसीएम गारमेंट कंपनीत कामावर होत्या. अचानक लॉकडाऊन झाले आणि काम बंद झाले. त्यांच्याजवळ असलेल्या पैशातून महिनाभर जेवणाची व्यवस्था झाली.

लॉकडाऊनमुळे अडकल्या, पोलिसांचा मारही खाल्ला, एक देवदूत भेटला आणि... 

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : सलग दोन वर्षांपासून तमिळनाडूतील एका गारमेंटच्या कंपनीत काम करणाऱ्या नऊ तरुणींना लॉकडाऊनरूपी राक्षसाने घेरले. असह्य वेदना सहन करून त्या बिहार-उत्तरप्रदेशकडे जाणाऱ्या रेल्वेत बसल्या. नागपूर रेल्वेस्थानकावर उतरू न देणाऱ्या पोलिसांकडून त्यांनी मारही खाल्ला. हा त्रास सहन करून त्या डॉ. नीलेश भरणे यांच्यापर्यंत पोहचल्या. डॉ. भरणे यांनी त्यांची जाण्याची व्यवस्था करून थेट मध्यप्रदेशातील बालाघाट शहरात पोहचवून दिले. हा खडतर प्रवास पूर्ण केल्यानंतर डॉ. भरणे यांना तरुणींनी तीन पानी पत्र पाठवून आभार मानले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बालाघाट शहरात राहणाऱ्या नऊ तरुणी तामिळनाडूतील तिरपूर जिल्ह्यात असलेल्या इसीएम गारमेंट कंपनीत कामावर होत्या. अचानक लॉकडाऊन झाले आणि काम बंद झाले. त्यांच्याजवळ असलेल्या पैशातून महिनाभर जेवणाची व्यवस्था झाली. मात्र, शेवटी पदरचे पैसे संपले आणि खाण्याचे वांदे झाले. त्यानंतर तिरपूर येथील काही सामाजिक संघटनांना मदत मागितली. त्यांनी 20 किलो तांदूळ प्रतिव्यक्‍ती आणि फक्‍त एक किलो तेल दिले. दिवसातून एक वेळ जेवण करून दिवस काढणे सुरू झाले. लॉकडाऊन वाढत गेल्यामुळे बाहेर जाऊन खाण्याच्या वस्तू मागण्याची वेळ तरुणींवर आली. 

कोरोनाची दहशत आणि वातावरणाला कंटाळल्याने गावाला जाण्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनला संपर्क साधला व पोहोचवून देण्याची विनंती केली. मात्र, प्रत्येक वेळी एकच उत्तर "मध्यप्रदेशला जाण्यासाठी एकही गाडी नाही'. यावर बसची व्यवस्था केल्यास प्रत्येकी 7500 रुपये खर्च करावे लागतील व त्यासाठी पुन्हा 25 प्रवासी लागतील. आणखी 25 जण जमवायचे तरी कुठून अन्‌ इतके पैसे आणायचे कुठून? हा प्रश्‍न होता. सामाजिक संस्था, पोलिस, शासनाकडे मदत मागूनही मिळत नव्हती. 
 

दिसला आशेचा किरण 

तिरपूर पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने एका तरुणीला फोन करून एक रेल्वे बिहारला जात असल्याचे सांगितले. आशेचा किरण दिसताच सर्वच मुलींनी बॅगा भरल्या आणि रेल्वे स्टेशन गाठले. तेथील पोलिस अधिकाऱ्याला विचारणा केली असता "ही रेल्वेगाडी थेट बिहारला जाते. मध्य प्रदेशसाठी अद्याप गाडी नाही' उत्तर ऐकताच सर्वांचे चेहरू हिरमुसले. मात्र, जिद्द कायम होती. तरुणींनी घरी परतण्याऐवजी रेल्वेत बसण्याचा निर्णय घेतला. 

 महत्त्वाची बातमी - सांग तुझे बॉयफ्रेण्ड किती? मुलीचे नेमके काय झाले... वाचा
 

आयपीएस अधिकाऱ्याला आली दया 


बिहारला जाणाऱ्या रेल्वेत बसण्यासाठी पासेसचे वितरण करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला तरुणींनी आपबिती सांगितली. "ही रेल्वे महाराष्ट्रातून जात असून, नागूपर रेल्वे स्थानकावर आम्ही उतरणार आणि तेथून पायी मध्य प्रदेश गाठणार' असे सांगितल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी रेल्वेत बसण्यास सांगितले. मनातील धाकधूक कमी होत नाही तोच नागपुरात पोहचलो आणि आणखी एक संकट ओढवले. 
 

पोलिसांनी दिले दंडे 

नागपूर रेल्वे स्थानकावर चहापाण्यासाठी गाडी थांबली आणि आठही तरुणींनी बॅगासह खाली उड्या घेतले. रेल्वे पोलिसांना तरुणी खाली उतरताना दिसताच लगेच धाव घेतली. "तुमच्याकडे बिहारची पास आहे, मग नागपुरात उतरता येणार नाही,' असा दम दिला. तरीही तरुणी डब्यात बसायला तयार नव्हत्या. त्यामुळे दोन कर्मचाऱ्यांच्या हातून त्यांना मारही खावा लागला. पोलिसांचा मार खाल्ला. त्यामुळे तरुणी नाइलाजास्तव डब्याच्या दाराजवळ उभ्या झाल्या, पण डब्यात बसल्या नाही. गाडी सुरू झाली आणि त्यांनी खाली उड्या घेतल्या. एकदाची रेल्वे निघून गेली आणि पोलिसांनी डोक्‍यावर हात मारून घेतला. 
 

काळाकुट्ट अंधार आणि भुकेने व्याकूळ 

पोलिसांना गुंगारा देऊन रात्री साडेदहा वाजता नऊ तरुणी रेल्वेस्थानकाबाहेर आल्या. सर्व जणी भुकेने व्याकूळ होत्या तर बाहेर अंधार झालेला होता. कुणीही दिसत नव्हते. चौकात गेल्यानंतर एका पोलिस काका भेटले. 20 तासांपासून प्रवासात असल्याने भूक लागल्याचे सांगितले. पोलिस काकाने दोन बिस्किटचे पुडे, स्वतःसाठी आणलेला डब्बा आणि बाटलीभर पाणी दिले. 
 

डॉ. नीलेश भरणेंची झाली भेट

 "पोरींनो, मी तर नाही पण आमचे डॉ. भरणे साहेब तुम्हाला नक्‍की मदत करतील' असे म्हणून डॉ. भरणे यांचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यांनी लगेच फोन केला. डॉ. भरणे यांनी तरुणींची भेट घेतली. त्यांना जेवण दिले. त्यांची वैद्यकीय चाचणी करण्याची व्यवस्था केली. त्यानंतर स्वतःच्या पैशातून एक वाहन भाड्याने करून दिले. बालाघाट शहरात जाण्याची व्यवस्था केली. त्यांच्यासोबत खाण्या-पिण्याच्या वस्तू दिल्या. अशाप्रकारे तामिळनाडूतील तरुणी आपापल्या घरापर्यंत सुखरूप पोहचल्या.