राज्याचे वनबलप्रमुख म्हणून यांनी स्वीकारला पदभार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

सांघिक भावनेसह प्रामाणिकपणे नियोजनबध्दरीत्या कार्य केल्यास कोणतीही संघटना यशस्वी होऊ शकते. आलापल्ली सारख्या दुर्गम भागात वनविभागाची कामे करताना अनेक बाबी शिकता आल्या. आपल्याला नेमूने दिलेले काम मन लावून व प्रमाणिकपणे करत राहणे आपले कर्तव्य आहे असे आवाहन मावळते वनबल प्रमुख डॉ. सुरेश गैरोला यांनी केले. 

नागपूर :  राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) म्हणून आज डॉ. एन. रामबाबू यांनी मावळते वनबल प्रमुख डॉ. सुरेश गैरोला यांच्या हस्ते पदभार स्वीकारला. रामबाबू हे 1986 च्या भारतीय वन सेवा संवर्गातील अधिकारी आहेत. परिविक्षा कालावधीत ते सर्वप्रथम यवतमाळ येथे रुजू झाले होते. सध्या ते महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. 

तत्पूर्वी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) डॉ. सुरेश गैरोला, विभागीय वनाधिकारी डी.सी. चकोले, कार्यालय अधिक्षक व्ही. डी. बाकडे, मंगला जाळेकर, मुख्य वनसांखिकी एस. जे. कराले, सहाय्यक लेखाधिकारी ए. जे राठोड, क्षेत्र सर्व्हेक्षक आर. व्ही. सोनगिरे, लिपीक अब्दुल सईद शेख, नाईक गणेश सकर्डे, नाईक, बंडु तिजारे या दहा जणांना सामाजिक अंतराचे पालन करुन टकले सभागुहात शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी रामबाबू होते. 

हेही वाचा - 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...

निरोप समारंभात सत्काराला उत्तर देताना डॉ. गौरोला म्हणाले, सांघिक भावनेसह प्रामाणिकपणे नियोजनबध्दरीत्या कार्य केल्यास कोणतीही संघटना यशस्वी होऊ शकते. आलापल्ली सारख्या दुर्गम भागात वनविभागाची कामे करताना अनेक बाबी शिकता आल्या. आपल्याला नेमूने दिलेले काम मन लावून व प्रमाणिकपणे करत राहणे आपले कर्तव्य आहे असे आवाहन केले. शासकीय काम करताना मला सांघिक व कौटुंबिक कामाचा अनुभव आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी प्रधान मुख्य वन संरक्षक साईप्रकाश, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वन संरक्षक प्रविण श्रीवास्तव, प्रधान मुख्य वन संरक्षक एम. के. राव, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक टी. के चौबे, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक महिप गुप्ता, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक शैलेश टेंभुर्णीकर, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक विकास उपस्थित होते. रामबाबू यांचे अध्यक्षीय भाषण झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Rambabu Took Charge as a PCCF (HoFF)