काळजी घ्या, बरे झालेल्या रुग्णांना महिनाभरानंतरही लक्षणे;  काय सांगतात तज्ज्ञ डाॅक्टर

राजेश प्रायकर 
Tuesday, 6 October 2020

महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'कोव्हिड संवाद' फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात मंगळवारी डॉ. सुषमा ठाकरे आणि डॉ. उमेश रामतानी यांनी 'कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर घ्यावयाची काळजी' या विषयावर माहिती दिली.

नागपूर : कोरोनाबाधितांना विलगीकरणातील निर्धारित कालावधी पूर्ण केल्यानंतर रुग्णालयातून रुग्णाला सुटी देण्यात येते. रुग्ण गृह विलगीकरणातील बाधितांनाही १७ दिवसानंतर घराबाहेर पडता येईल. मात्र, कोव्हिडमधून बरे झाल्यानंतरच्या काळातही आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कोव्हिडनंतर अनेकांना वेगवेगळे त्रास झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर एकदम सुदृढ असून कुठेही जाऊ शकतो हा गैरसमज कुणीही बाळगू नका, असा सल्ला आयएमएच्या सहसचिव व मेयोतील कम्युनिटी मेडिसीन विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. सुषमा ठाकरे आणि बधिरीकरण विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. उमेश रामतानी यांनी दिला.

महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'कोव्हिड संवाद' फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात मंगळवारी डॉ. सुषमा ठाकरे आणि डॉ. उमेश रामतानी यांनी 'कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर घ्यावयाची काळजी' या विषयावर माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते. कोव्हिडची लक्षणे दिवसेंदिवस बदलत आहेत. सुरुवातीला ताप, सर्दी, कोरडा खोकला, श्वास घ्यायला त्रास अशी लक्षणे कोव्हिडबाधितांमध्ये दिसायची. 

हेही वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला
 

आता चव जाणे, वास न येणे, छातीत दुखणे, हगवण, थकवा अशा लक्षणांसह बधिरता हे लक्षणेसुद्धा काही रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. विनाकारण घराबाहेर पडू नका, पडल्यास मास्क लावा, गर्दीत जाणे टाळा, शारीरिक अंतर राखा. विलगीकरणाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळा, असे आवाहन त्यांनी केले.

महिनाभरानंतर पुन्हा लक्षणे

कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर अनेकांना महिनाभराने लक्षणे दिसून आली आहे. अनेकांची लक्षणे तीन-तीन महिन्यांपर्यंत कायम असल्याचेही दिसून आले आहे. कोव्हिडनंतर येणाऱ्या कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा, असे आवाहन डॉ. ठाकरे आणि डॉ. रामतानी यांनी केले. रुग्णालयात किंवा गृह विलगीकरणाचा १७ दिवसांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर पुन्हा कोव्हिडची चाचणी करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 
कोव्हीडनंतर होणारा त्रास

 • शारिरीक कमजोरी, सांधेदुखी, मांसपेशीमध्ये दुखणे
 • फुफ्फूस बाधित झाल्याने श्वास घेण्यास त्रास
 • झोप न येणे, नैराश्य
 • प्रतिकारशक्ती कमी झाल्याने विविध आजारांचा शिरकाव
 • नसांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने हृदयविकाराचा धक्का

कोव्हीडनंतर हे करा

 • सौम्य व्यायाम
 • भरपूर पाणी पिणे, फळांचा रस, नारळपाणी घेणे
 • अंडीचे सेवण, ताजे फळ घ्या

कोव्हीडनंतर हे टाळा

 • तेलकट पदार्थ
 • तिखट, चमचमित पदार्थ
 • जास्त मिठ असलेले तसेच गोड पदार्थ

संपादन  : अतुल मांगे  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Thackeray says Health care is essential even after home separation