खेळाडूंना कुणी सांगितला शिखराकडे जाण्याचा मार्ग...वाचा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

.सरावाला परवानगी द्यावी अशी मागणी होत असतानाच ऑनलाइन शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशाच एका शिबिरात खेळाडूंनी शिखराकडे कसे जावे, त्यासाठी काय प्रक्रिया आहे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

नागपूर : कोरोना आणि लॉकडाउनमुळे सध्या खेळाडूंचा सराव बंद आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंचे नुकसान होऊ नये यासाठी विविध संघटना ऑनलाइन मार्गदर्शन शिबिर आयोजित करीत आहे. खेळाडूंची मानसीकता टिकून राहावी हा या शिबिरामागील उद्देश आहे.

सरावाला परवानगी द्यावी अशी मागणी होत असतानाच ऑनलाइन शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशाच एका शिबिरात खेळाडूंनी शिखराकडे कसे जावे, त्यासाठी काय प्रक्रिया आहे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. राज्यातील विविध जिल्हा संघटनांचा समावेश असलेल्या महाबास्केटच्या बॅनरखाली क्रीडा व युवककल्याण संचालनालयाच्या सहकार्याने आयोजित ऑनलाइन महाबास्केट वेबिनारमध्ये हे मार्गदर्शन करण्यात आले. वेबिनारचे उद्‌घाटन  क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या हस्ते झाले.

वाचा - निर्णय चुकल्याने कसा हिरावला विदर्भाचा विजय

याप्रसंगी माजी बास्केटबॉलपटू व महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर व नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष महापौर संदीप जोशी उपस्थित होते. ठाकूर यांनी सहभागी खेळाडूंना मार्गदर्शन केले. जोशी यांनीही खेळाडू व प्रशिक्षकांना वेबिनारचा फायदा घेण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित क्रीडा आयुक्‍त ओमप्रकाश बाकोरिया यांनी राज्यातील युवा खेळाडूंसाठी बालेवाडी येथे भविष्यात बास्केटबॉल अकादमी सुरू करण्याची घोषणा केली.

आणखी वाचा - चिनी कंपन्यांचे  प्रायोजकत्व रद्द केल्यानंतर नवे प्रायोजक मिळवण्यास सुरूवातीला अडचणी येतील पण आपल्या देशातही प्रायोजकत्वांची कमी नाही.

सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे यांनीही मार्गदर्शन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली लगेच झालेल्या उद्‌घाटन सत्रात डॉ. धनंजय वेळूकर यांनी खेळाडू घडविण्याच्या प्रक्रियेवर मार्गदर्शन केले. जयंत देशमुख यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. छत्रपती क्रीडा पुरस्कारविजेते शत्रुघ्न गोखले यांनी संचालन केले. बुधवारी फिजिओ डॉ. केविन अग्रवाल दुखापती व प्रथमोपचारासंदर्भात खेळाडूंना टिप्स देणार आहेत. याप्रसंगी उपसंचालक अविनाश पुंड व मुंबईचे एम. ओ. वर्गीस उपस्थित राहतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Welukar delivered the lecture on Process to Peak