पोलिसांनी उतरवली मद्यपींची झिंग : राज्यात सर्वाधिक ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह कारवाई या शहरात

Drunkdriving.
Drunkdriving.

नागपूर : होळी आणि रंगपंचमीला मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरूद्ध वाहतूक पोलिसांनी धडाकेबाज मोहीम चालविली. दोन दिवसांत 1026 मद्यपी वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याकडून जवळपास पाच लाखांपेक्षा जास्त दंड पोलिसांनी वसुल केला. राज्यभरातील सर्वात मोठी कारवाई नागपुरात करण्यात आली हे विशेष.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगपंचमीनिमित्त शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. रस्त्यावर अपघात होऊ नये म्हणून वाहतूक पोलिस मोठ्या प्रमाणात बंदोबस्तात होते. सोमवार आणि मंगळवारी वाहतूक पोलिसांनी विशेष अभियान राबवित पहिल्या दिवशी 315 तर दुसऱ्या दिवशी 711 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. कामठी परिमंडळाच्या पोलिसांनी सर्वाधिक 150 मद्यपींवर कारवाई केली तर कॉटन मार्केट परिमंडळाने 144 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली. अनेक मद्यपींच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. ज्या चालकांना वाहन चालविणेही कठिण जात होती, अशा चालकांना अख्खी रात्र पोलिस ठाण्यात घालवावी लागली. रस्त्यावर तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांमुळे अनेकांनी घराच्या छतावर किंवा मित्राच्या गेस्टहाऊसमध्ये पार्टी एंजॉय केली तर काहींनी थेट फार्म हाऊस किंवा शेत गाठले होते. काही वाहनचालकांनी पोलिसांपासून वाचण्यासाठी विविध शक्‍कल लढविल्या. ज्या चौकात पोलिस उभे आहेत, त्या चौकाला फेरा मारून किंवा मित्रांना फोन करून नाकाबंदीचा पॉईंट विचारून पोलिसांच्या कारवाईपासून पळ काढला. रात्री उशिरापर्यंत वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त होता. यासोबत मुंबई दारू कायद्याअंतर्गत नागपूर पोलिसांनी 33 आरोपींना अटक करून 3 लाख 49 हजार रूपयांचा मुद्‌देमाल जप्त केला. जुगार अड्ड्यांवर छापे घालून 61 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 53 हजार रूपये जप्त करण्यात आले. शहरभरात राबविण्यात आलेल्या कारवाईमुळे वाहनचालकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनिस, महेश चव्हाण, मनोहर कोटनाके, जयेश भांडारकर, संदीप भोसले, रोशन यादव, दुबे यांनी केली.

अशी झाली कारवाई
चेम्बर कारवाई
एमआयडीसी -90
सोनेगाव - 45
सीताबर्डी - 116
सदर - 70
कॉटन मार्केट - 144
अजनी - 99
लकडगंज - 97
इंदोरा - 111
कामठी - 150

कारवाई सुरूच राहणार
रस्ते अपघात होऊन कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी गेल्या तीन दिवसांपूर्वीच बंदोबस्ताचे नियोजन केले होते. या कारवाईत नागपूर पोलिस राज्यात "नंबर वन' ठरले. प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे होळीचा बंदोबस्त यशस्वी ठरला. यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.
 विक्रम साळी, पोलिस उपायुक्‍त (वाहतूक शाखा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com