
प्रत्येक तालीम केंद्रांवरून २५ या प्रमाणे जिल्ह्यातील ७५ आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रतीकात्मक लस दिली जाईल. प्रत्येक केंद्रावर चार व्हॅक्सिनेटर्ससह एक परिचारिका, एक सुरक्षारक्षक, एक डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि एक सहायक अशा आठ व्यक्ती तैनात असतील.
नागपूर : केंद्र आणि राज्य सरकार यांनी प्राथमिकतेच्या आधारावर आघाडीवर राहून कोरोनाशी लढणाऱ्या योध्यांचा डेटाबेस तयार केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष लस उपलब्ध झाल्यानंतर गोंधळ उडू नये यासाठी आज जिल्ह्यातील तीन केंद्रांवर कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कामठी, मनपाच्या हद्दीतील के. टी. नगर येथील आरोग्य केंद्र आणि डागा स्मृती स्त्री रुग्णालयात सकाळी ९ ते ११ या दोन तासांमध्ये एकूण ७५ जणांना प्रतीकात्मक लस दिली जाईल.
हे प्रत्यक्ष लसीकरण नाही. लसीकरणावेळी समोर कोणकोणती आव्हाने येऊ शकतात, याची चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालीम केंद्रांवरून २५ या प्रमाणे जिल्ह्यातील ७५ आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रतीकात्मक लस दिली जाईल. प्रत्येक केंद्रावर चार व्हॅक्सिनेटर्ससह एक परिचारिका, एक सुरक्षारक्षक, एक डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि एक सहायक अशा आठ व्यक्ती तैनात असतील.
ज्याप्रमाणे अन्य लसीकरण अभियान राबविले जाते. त्यापेक्षा ही थोडी वेगळी मोहीम असेल. राज्यभर एकाचवेळी होणाऱ्या या लसीकरण ड्राय रनच्या माध्यमातून प्रथमच नोंदणी केलेला आरोग्यसेवक केंद्रात आल्यापासून त्याचा केंद्रावरील ऑनलाइन प्रवेश आणि लस दिल्यापासून त्याच्यावर काही रिॲक्शन झाल्यास त्याचीही ऑनलाइन नोंदणी केली जाईल.
मनपातील ३१ हजार कर्मचाऱ्यांची यादी
प्रत्यक्ष लस उपलब्ध झाल्यानंतर तीन टप्प्यांमध्ये लसीकरण अभियान राबविले जाईल. कोव्हिडयोद्धा हेल्थ केअर वर्कर यांना लसीकरणात प्रथम स्थान देण्यात आले आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या गाइडलाइननुसार ९८ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती कोविड ॲपवर अपलोड करण्यात आला आहे. मनपाच्या ३१,०१४ कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे.
शनिवारच्या ट्रायल रनमध्ये यापैकीच २५ जणांची निवड करण्यात आली आहे. प्रत्यक्ष लस प्राप्त झाल्यानंतर ५६ लसीकरण केंद्रे सुरू केली जातील. त्याचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे, असे पत्रकारांशी साधलेल्या संवादात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले.
संपादन - नीलेश डाखोरे