गर्दीमुळे मनपा ‘ॲक्शन मोड'मध्ये

राजेश प्रायकर
Tuesday, 10 November 2020

कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन न केल्यास दुकानदारांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश मनपा अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिले. महापालिकेच्या सर्व सहायक आयुक्तांनी बाजारपेठेत जाऊन गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी उपाय करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

नागपूर : शनिवार व रविवारी शहरातील विविध बाजारपेठेत खरेदीसाठी झालेल्या गर्दीने महापालिका ‘ॲक्शन मोड'मध्ये आली. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज शासनाच्या दिशानिर्देशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या दुकानदारांवर सक्तीने कारवाई करण्याचे निर्देश मनपा आणि पोलिस अधिकाऱ्यांना दिले.

शहरातील बाजारांमध्ये पुढे गर्दी होऊ नये यासाठी मनपा, वाहतूक पोलिस समन्वयाने कार्य करणार आहेत. ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत नागरिकांना शिथिलता देण्यात आली आहे. शासनाच्या दिशानिर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करण्याचे नागरिकांना तसेच दुकानदारांना वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. परंतु दिवाळीच्या खरेदीसाठी शनिवार तसेच काल, रविवारी नागरिकांनी सीताबर्डी, महाल, इतवारीसह अनेक भागात मोठी गर्दी केली.

गर्दी रोखण्याच्या उपाययोजनांसंदर्भात आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी तातडीने आज बैठक घेतली. बैठकीत पोलिस उपायुक्त (वाहतूक)सारंग आवाड, मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, मिलींद मेश्राम, महेश मोरोणे, प्रकाश वराडे, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त अशोक पाटील, विजय हुमणे, बर्डीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनिस आदी उपस्थित होते.

महापौरांच्या कारपासून तर कचरा गाड्यापर्यंत सर्वच वाहने सीएनजीवर रूपांतरीत करा; नितीन गडकरींची सूचना

याशिवाय सीताबर्डी शॉप असोसिएशनचे प्रतिनिधी तसेच हॉकर्सच्या प्रतिनिधीही उपस्थित होते. कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन न केल्यास त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश मनपा अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिले. महापालिकेच्या सर्व सहायक आयुक्तांनी बाजारपेठेत जाऊन गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी उपाय करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

परवाना रद्द करण्याचा इशारा
दुकानदाराने निर्देशाचे उल्लंघन केल्यास पहिल्यांदा ५ हजार रुपये, दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास ८ हजार रुपये आणि तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास १० हजार रुपये दंड वसूल करण्याचे राज्य शासनाचे आदेश आहेत. या दंडात्मक तरतुदी शिवाय नियमभंग करणारे सर्व दुकानदार, आस्थापना मालकांवर फौजदारी गुन्हा तसेच परवाना रद्द करणे, दुकान बंद करणे अशीही तरतूद आहे. नियमभंग करणारे या कारवाईस पात्र राहतील, असा इशारा आयुक्तांनी दिला.

गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त
गर्दी टाळण्यासाठी तसेच कोविडसंदर्भात नियमाचे पालन करण्यासाठी बाजारात पुरेसे अतिरिक्त पोलिस तैनात करावे, असे पत्र मनपा आयुक्त राधाकृष्णन यांनी पोलिस आयुक्त अमितेष कुमार यांना दिले. वाहनांसाठी संबंधित रोड किंवा भाग प्रवेशबंद करून पर्यायी मार्ग किंवा पार्किंग व्यवस्था नेमून देणे, पुरेसे बॅरिकेट्स लावणे, दंड करण्यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्या, असेही आयुक्तांनी पत्रात नमूद केले आहे.

बाजारामध्ये दुकानदार, हॉकर्स यांनीही समंजसपणाने व्यवसाय करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या संकटात सरकारच्या नियमांचे पालन करून एकत्रित लढा द्यायचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्या.
राधाकृष्णन बी. आयुक्त, मनपा.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the crowd, the corporation is in action mode