मुंबई, दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये गर्दी, दिवाळीमुळे वाढले वेटिंग

योगेश बरवड
Thursday, 5 November 2020

कोरोनाच्या संकटामुळे मर्यादित रेल्वेगाड्याच चालविण्यात येत आहेत. या गाड्यांमध्ये जागा मिळावी यादृष्टीने अनेकांनी पूर्वीच नियोजन करीत तिकीट काढून घेतले आहे. यामुळे बऱ्याच गाड्यांच्या नावासमोर ‘वेटिंग’ सुरू झाले आहे.

नागपूर  ः कोरोना परिस्थितीतही बाहेरगावी असणाऱ्यांना स्वगृहीच दिवाळी साजरी करण्याचे वेध लागले आहे. रेल्वेगाड्यांच्या लांबलेल्या प्रतीक्षा यादीवरून ते लक्षात येते. दिवाळीच्या काळातील जवळपास सर्वच रेल्वेगाड्यांच्या ‘वेटिंग’मध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने मुंबई आणि दिल्ली मार्गावरील गाड्यांमध्ये सर्वाधिक गर्दी आहे.

कोरोनाच्या संकटामुळे मर्यादित रेल्वेगाड्याच चालविण्यात येत आहेत. या गाड्यांमध्ये जागा मिळावी यादृष्टीने अनेकांनी पूर्वीच नियोजन करीत तिकीट काढून घेतले आहे. यामुळे बऱ्याच गाड्यांच्या नावासमोर ‘वेटिंग’ सुरू झाले आहे. दिवाळी आठवडाभरावर येऊन ठेपली आहे. यामुळे तिकीट मिळविण्याची लगबग वाढली आहे. 

येणाऱ्या दिवसांमध्ये हे वेटिंग अधिकच वाढणार आहे. १३ ते १६ दरम्यान दिवाळी आहे. यामुळे १३ पूर्वी येणाऱ्या गाड्यांमध्ये गर्दी झाल्याचे दिसून येते. शनिवारचे लक्ष्मीपूजन आटोपून रविवारी परतणाऱ्यांची संख्या अधिक असून १५ व १७ नोव्हेंबर रोजी इथून जाणाऱ्या गाड्यांमध्ये संख्या अधिक आहे.

हेही वाचा - फडणवीसांना टक्कर देणाऱ्या आशिष देशमुखांनी शिक्षक मतदार संघाकडे वळवला मोर्चा; निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता
 

विदर्भ, महाराष्ट्र खचाखच, दुरांतोमध्ये अजूनही संधी

०२१९० नागपूर- मुंबई दुरांतोमध्ये बऱ्यापैकी जागा उपलब्ध आहे. पण, दिवाळीनंतर १६, १७, १८ नोव्हेंबरला आरएसी सुरू आहे. ०२१०६ गोंदिया -मुंबई विदर्भ एक्स्प्रेस मध्ये आतापासूनच वेटिंग सुरू झाले आहे. एसी आणि स्लिपरमध्येही जागा फुल झाल्या आहेत. हिच अवस्था ०१०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र स्पेशल ट्रेनमध्येही आहे. ०२८१२ हटिया - लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल ट्रेनमध्येही २५ पर्यंत वेटींग पोहोचले आहे. भुवनेश्वर - लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल ट्रेनमध्ये २४ नोव्हेंबरपर्यंत जागेची उपलब्धता नाही. ०२१०२ नागपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशलमध्ये सर्वच क्षेणीचे बर्थ फुल्ल असून वेटींग ३५ पर्यंत पोहोचले आहे. 

०२८५७ नागपूर- विशाखापट्‍नम स्पेशल ट्रेनमध्ये सर्वच श्रेणीच्या तिकिटांचे वेटिंग सुरू झाले आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत हिच स्थिती आहे. पुरी-एलटीटी साप्ताहिक स्पेशल ट्रेनमध्येही वेटींगचे तिकीट मिळत आहे. ०२२६९ चेन्नई-ह.निजामुद्दीन दुरांतोमध्ये २० पर्यंत बरीच गर्दी असून वेटिंग ३५ च्याही वर पोहोचले आहे. कोरबा- अमृतसर स्पेशल, संत्रागीछी -पुणे स्पेशल, हावडा -पुणे स्पेशल, नागपूर- अमृतसर स्पेशल ट्रेन, त्रिवेंद्रम- नवी दिल्ली एक्स्प्रेसमध्येही वेटिंग लिस्ट बरेच वाढली आहे. चेन्नई - नवी दिल्ली जीटी एक्स्प्रेसमध्ये वेटींग ५५ पर्यंत, हावडा-मुंबई मेलचे वेटिंग ५०, विशाखापट्‍नम- नवी दिल्ली स्पेशल आणि हैदराबाद - नवी दिल्ली तेलंगणा एक्सप्रेसमध्येही ३५ च्यावर वेटिंग गेले आहे.

रेल्वेवरील ताण झाला कमी

आजवरचा अनुभव लक्षात घेतल्यास दिवाळीच्या काळातील गाड्यांचे वेटिंग तुलनेने बरेच कमी आहे. नियमित गाड्या बंद असून मोजक्याच गाड्या धावत आहे. अशात वेटिंगची यादी अधिक वाढण्याची अपेक्षा होती. पण, कोरोनाकाळातच अनेक कुटुंब स्वगृही परतले, शिवाय कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांनी खासगी गाड्यांचा पर्याय निवडल्याने रेल्वेवरील ताण काहीसा कमी झाल्याचे जाणकार सांगतात. 

संपादन  : अतुल मांगे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to Diwali, trains to Mumbai and Delhi are full