फडणवीसांना टक्कर देणाऱ्या आशिष देशमुखांनी शिक्षक मतदार संघाकडे वळवला मोर्चा; निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता 

राजेश चरपे 
Thursday, 5 November 2020

आशिष देशमुख काटोल विधान सभा मतदारसंघाचे आमदार होते. मात्र भाजपसोबत विदर्भाच्या विकासाच्या मुद्यावर मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता.

नागपूर ः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात कडवी लढत देणारे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी आपला मोर्चा आता अमरावती शिक्षक मतदार संघाकडे वळविला आहे. ते येथून लढण्यासाठी चाचपणी करीत असल्याचे समजते. त्यांनी उडी घेतल्यास निवडणुकीत चांगलीच रंगत येण्याची शक्यता आहे. 

सविस्तर वाचा - प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उल्टीचा त्रास होतो? घाबरू नका पुढील उपाय नक्की करून बघा

आशिष देशमुख काटोल विधान सभा मतदारसंघाचे आमदार होते. मात्र भाजपसोबत विदर्भाच्या विकासाच्या मुद्यावर मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेसने त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातच उभे केले. 

सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक देशमुख यांनी चांगलीच अटीतटीची केली. एक लाखांच्या मताधिक्यांचा भाजपचा दावा त्यांनी फेल ठरवला. फडणवीस ४९ हजार मतांच्या फरकाने निवडून आले. 

राज्यपालनियुक्त विधान परिषदेसाठी देशमुख प्रयत्न करीत होते. त्यांच्या नावाची चर्चाही होती. मात्र आता त्यांनी अमरावती शिक्षक मतदारसंघात स्वारस्य दाखवणे सुरू केले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

अधिक माहितीसाठी - साहेबऽऽ आता आत्महत्या करण्याची रितसर परवानगी घेणार; पिककर्जाची अत्यंत गरज

भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्या विरोधात महाआघाडीने देशमुख यांना उमेदवारी दिल्यास मोठी चुरस निर्माण होऊ शकते. भाजप एकटी पडल्याने महाआघाडीचा उमेदवार जिंकून येण्याची शक्यता असल्याने देशमुख यांनी चाचपणी केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asish deshmukh now looking to enter in teachers election in Amravati