लॉकडाउनमुळे घसरला देहदानाचा टक्का

केवल जीवनतारे
Friday, 7 August 2020

वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शरीररचना शास्त्र विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी मृतदेहाची गरज असते.

नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय क्षेत्रावर कमालीचा ताण निर्माण झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांवर सरकारी आणि खासगी रुग्णालयांत भर दिला जात आहे. याचा परिणाम अवयव प्रत्यारोपणावर झाला आहे. अनेक शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. पाच महिन्यांत नागपुरात एकही प्रत्यारोपण झाले नाही. तर मरणोत्तर देहदानालाही लॉकडाउनचा फटका बसला असून, पाच महिन्यांत केवळ तीन देहाचे दान मेडिकलमध्ये प्राप्त झाले आहे. 

सध्या ती काय करते? 'स्वदेश' फेम गायत्री जोशीची कहाणी, वाचा...

वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शरीररचना शास्त्र विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी मृतदेहाची गरज असते. ही गरज देहदानातून पूर्ण होते. परंतु, गेल्या दहा वर्षांपासून अत्यल्प देहदान होत आहे. यामुळे बेवारसांच्या मृतदेहांतून मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक अभ्यासाची गरज भागविली जाते. देहदानाबाबत हळूहळू जागरूकता निर्माण होत आहे. सहा तासांच्या आता देहदान झाल्यास अंध व्यक्तीला नेत्रदानाचा फायदा होऊ शकतो. २०१७ या वर्षात उपराजधानीत ३२ जणांनी देहदान केले होते. 

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

नुकतेच चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू झाले. येथील शरीररचनाशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मृतदेह नव्हते. ही गरज मेडिकलने भागवली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) २०१८ मध्ये २७ जणांचे देहदान झाले. तर मेयोत ५ जणांचे देहदान झाले. २०१९ मध्ये मेडिकलमध्ये ३६ तर मेयोत ९ जणांचे देहदान झाले होते. २०२० मध्ये देहदानाचा टक्का खाली आला आहे. जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यात १० देहदान झाले. मार्च ते ऑगस्ट दरम्यान केवळ तीन जणांचे देहदान झाल्यामुळे टक्का घसरला आहे. 

मृतदेहाची कोरोना चाचणी 
अलीकडे कोण कधी कोरोनाबाधित होईल, हे सांगणे कठीण आहे. यामुळे देहदान स्वीकारताना ज्या डॉक्टरने उपचार केले होते त्यांचे कोरोना नसल्यासंदर्भातील प्रमाणपत्र असावे लागते. जर असे पत्र नसेल तर मग मृतदेहाची कोरोनासाठी चाचणी केली जाते. कोरोना नसलेल्या मृतदेहाचे दान स्वीकारले जाते, असे मेडिकलच्या शरीररचनाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एन. कामडी यांनी सांगितले. 

(संपादन : प्रशांत राॅय)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to lockdown organ transfer, body donations dropped