या कारणांमुळे हजारो महिलांचा रोजगार सापडलाय संकटात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जून 2020

ऐन उन्हाळ्याच्या काळात संचारबंदी लागल्यामुळे लोणची, पापड तसेच मसाल्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. या पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या महिला गृहउद्योग तसेच बचत गटांचे काम बंद पडण्याच्या मार्गावर असून, काही ठिकाणी तर टाळेही लागले आहेत. त्यामुळे शहरातील हजारो महिलांचा रोजगार संकटात सापडला आहे. 

नागपूर : ऐन उन्हाळ्याच्या काळात संचारबंदी लागल्यामुळे लोणची, पापड तसेच मसाल्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. या पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या महिला गृहउद्योग तसेच बचत गटांचे काम बंद पडण्याच्या मार्गावर असून, काही ठिकाणी तर टाळेही लागले आहेत. त्यामुळे शहरातील हजारो महिलांचा रोजगार संकटात सापडला आहे. 

दुसरीकडे घरच्याघरी असे पदार्थ बनवणे सुरू केलेल्या महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचेही दृष्य आहे. अनेक ठिकाणी "लॉकडाउन'असल्याने बनवलेला माल पडून राहीला आहे. मानेवाडा भागातील श्रीसाई गृहउद्योगाचा मुख्य फेणी तयार करण्याचा प्रमुख व्यवसाय आहे. दरवर्षी रमझान महिन्यात व ईद पर्वानिमित्त त्यांचा उद्योग बहरतो. वर्षाला किमान अडिच लाखांचा निव्वळ नफा होतो. यंदा मात्र ते सुख लाभले नसल्याची खंत गृहउद्योगाच्या संचालिका नलिनी वानखेडे यांनी व्यक्‍त केली. 

वाचा : चोरीच्या रकमेवरून झाला वाद, दारूच्या नशेत उचलला दगड आणि...

साधारण फेब्रुवारी महिन्यापासून ते पावसाच्या सरी येतपर्यंत लोणची, पापड तसेच मसाले तयार करण्याचे काम शहरात मोठ्या प्रमाणात चालते. काही ठिकाणी बचत गटांतील महिला तर काही ठिकाणी अनेक वैयक्तिक स्वरूपात हे पदार्थ तयार होतात. अनेकांचे कुटुंब मोठे असल्याने अनेक महिला या व्यवसायावर अवलंबून असतात; मात्र, लॉकडाउन जाहीर झाल्यापासून बाजारात मालाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला. काही ठिकाणी चढ्या भावाने विक्री केली जात असल्याने तक्रारीही आल्या आहेत. 

वाचा : महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांसाठी ऊर्जामंत्र्यांची मोठी घोषणा

निम्माही टप्पा गाठला नाही 
शेवयांचा मुख्य व्यवसाय असलेल्या हुडकेश्‍वर येथील अंबादेवी गृहउद्योगाला देखील कोरोनाची झळ बसली आहे. पापड, कुरडईसह फेणी व शेवयांसाठी प्रसिद्ध ठरलेल्या या उद्योगाने यंदा निम्माही टप्पा अद्याप गाठलेला नाही. केवळ चार महिन्यांच्या भरवशावर चालणारा हा व्यवसाय पूर्णत: ठप्प असल्याची खंत उद्योगाच्या संचालिका अश्‍विनी अंबरकर यांनी व्यक्‍त केली.

उन्हात वाळविण्यापासून कच्चा माल साठविण्यापर्यंत विविध अडचणी सध्या उद्योग चालकांना येत आहेत. घराबाहेर पडणे शक्‍य नसल्याने बनवलेला माल विकायचा कसा, हा प्रश्न अनेक महिलांसमक्ष आहे. दरवर्षी तीन महिन्यांच्या मेहनतीतून 60 ते 75 हजारांचे उत्पन्न घेणाऱ्या महिला यंदा मात्र आर्थिक संकटात आहेत. "करोना'मुळे सर्वच कठीण होऊन बसले असून, गृहउद्योग, बचत गटांच्या महिला आर्थिक संकटात सापडल्या आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to these reasons, thousands of women have found employment in crisis