कोविड केअर सेंटरच्या पदभरतीला ग्रहण; या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जून 2020

आरोग्य विभागाचे उपसंचालक मात्र याकडे कानाडोळा करीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड केअर सेंटर वर नवीन पदभरतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

हिंगणा (नागपूर) : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात कोविड केअर सेंटर निर्माण करण्याचे आदेश देण्यात आले. या सेंटरमध्ये स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी भरती करण्याचे निर्देश शासनाने दिले. मात्र, तालुकास्तरावरील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भार दिला सुरू आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील दैनंदिन कामे विस्कळीत होत आहेत. 

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आलेत. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर निर्माण करण्याचे आदेश दिले. प्रत्येक तालुक्‍यात कोविड केअर सेंटरची निर्मिती जवळपास पूर्णत्वास आली आहे. ज्या तालुक्‍यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू झाले आहे. 

कोविड केअर सेंटरची निर्मिती करताना वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची स्वतंत्ररीत्या पदभरती करून नियुक्ती करावी, असे आदेश राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिले आहे. मात्र, एकाही नवीन कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नाही. तालुकास्तरावरील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांना कामावर तैनात करण्यात आले आहे. वानाडोंगरी येथील डॉ. आंबेडकर मुलांच्या वसतिगृहात सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये तीन शिफ्टमध्ये रुग्णसेवेचे काम सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील नियमित कामावर याचा विपरीत परिणाम होत आहे.

कोविड केअर सेंटरवर एका कर्मचाऱ्याची आठवडाभर ड्यूटी लावण्यात येत आहे. यानंतर सात दिवस होम क्वारंटाइन करण्यात येते. म्हणजे, एक कर्मचारी पंधरा दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रात येत नाही. यामुळे लसीकरण, माता-बाल संगोपन व इतर कामे ठप्प राहतात. आरोग्य विभागाचे उपसंचालक मात्र याकडे कानाडोळा करीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड केअर सेंटर वर नवीन पदभरतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

हेही वाचा : पालकांनो, असे सांभाळा किशोरवयीन मुलांचे मानसिक आरोग्य

पालकमंत्री पदभरतीचा मार्ग मोकळा करणार काय? 
कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी कोवीड केअर सेंटरमधील नवीन पदभरतीकरिता पालकमंत्री नितीन राऊत यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. पालकमंत्री याबाबत काय निर्णय घेतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eclips of covid care center recruitment