नितीन गडकरी म्हणतात, भांडवलाशिवाय अर्थव्यवस्थेला गती नाही

राजेश चरपे
शुक्रवार, 10 जुलै 2020

उच्च तंत्रज्ञान, कौशल्य, नवीन संशोधन यामुळे भारतीय वस्तूंची निर्यात शक्‍य आहे. उत्पादनाच्या दर्जामध्ये कोणताही समझोता न करता आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन तयार झाल्यास निर्यातीची मोठी संधी आपल्याकडे उभी आहे. तसेच याच काळात आपण ग्रामीण भागात नवीन उद्योगही सुरु करून यशस्वीतेकडे जाऊ शकतो.

नागपूर : ढासळलेल्या अर्थव्यवस्था उद्योगांमध्ये परकीय गुंतवणूक व बाजारात खेळते भांडवल आल्याशिवाय गतिशील होणार नाही, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघुउद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

'इंडिया ट्रान्सफॉर्मेशन समिट'मध्ये ना. गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करीत होते. कोरोनामुळे उद्योग जगतही संकटाचा सामना करीत आहेत. अशा स्थितीत आम्ही एमएसएमईच्या माध्यमातून उद्योगांना कसा दिलासा देता येईल, भांडवल उभे करण्यास मदत करीत असल्याचे सांगून ना. गडकरी म्हणाले, फंड्‌स ऑफ फंड या योजनेच्या माध्यमातून उद्योगांना भांडवल उभे करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. एमएसएमई आता ऍमेझॉन आणि अलीबाबा सारखी व्यवस्था उभी करणार आहे. एमएसएमईची व्याख्याच आम्ही बदलून टाकली आहे. जास्तीत जास्त क्षेत्रातील उद्योग या मंत्रालयाच्या कक्षेत कसे येतील व त्यांना कसा दिलासा देता येईल, या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या मार्चअखेर आम्ही 6 लाख उद्योगांची पुनर्बांधणी केली आहे, याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले.

हेही वाचा : सत्ताधारी पडले तुकाराम मुंढेंवर भारी; दिला 'स्मार्ट' धक्‍का

सध्याच्या वातावरणामुळे चीनशी अनेक देश, उद्योग, कंपन्या व्यवहार करण्यास तयार नसल्याचे सांगताना गडकरी म्हणाले, ही संधी भारतासाठी अत्यंत योग्य आहे. उच्च तंत्रज्ञान, कौशल्य, नवीन संशोधन यामुळे भारतीय वस्तूंची निर्यात शक्‍य आहे. उत्पादनाच्या दर्जामध्ये कोणताही समझोता न करता आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन तयार झाल्यास निर्यातीची मोठी संधी आपल्याकडे उभी आहे. तसेच याच काळात आपण ग्रामीण भागात नवीन उद्योगही सुरु करून यशस्वीतेकडे जाऊ शकतो.

कृषी, ग्रामीण आणि आदिवासी भागाचा विकास उद्योग या क्षेत्रात गेल्याशिवाय होणार नाही. आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या या भागाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढविण्याची आज देशाची गरज आहे. महानगरांकडे वळणाऱ्या उद्योगांनी आता कृषी, ग्रामीण आणि आदिवासी भागाकडे वळावे, असेही गडकरी म्हणाले.

संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Economy will not grow without capital : Nitin Gadkari