आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचे भाव कमी-जास्त झाल्याने खाद्य तेलाचे भाव वाढले; गृहिणींना फटका

राजेश रामपूरकर
Saturday, 21 November 2020

शेंगदाणा तेलाचे भाव दोन हजार ३२० रुपये डब्यावर पोहोचले आहे. गेल्यावर्षी दिवाळीच्या मुहुर्तावर सोयाबीन १३०० ते १३२० रुपये आणि शेंगदाणे तेल १७१० ते १७३० रुपये प्रति डब्बा भाव उघडले होते. तुळसी विवाहानंतर तेलाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

नागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचे भाव कमी-जास्त झाल्याचा परिणाम तेल बाजारावर झाला आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर सोयाबीन व शेंगदाणा या खाद्यतेलांचे भाव वाढले. त्याचा फटका गृहिणींना बसला.

आवक नसल्याचे कारण पुढे करून दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचा खिसा रिकामा झाला आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर तेलाचे भाव चढे राहतील असे म्हटले जात होते. त्याप्रमाणेच तेलाचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत ५०० रुपयांपेक्षा अधिक दराने उघडले आहेत. दिवाळीच्या पूर्वीच तेलाचे दर वाढलेले होते. तीच दरवाढ अजूनही सुरूच आहे.

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

पंधरा लिटरच्या सनफ्लॅावरच्या तेलावर ३५० ते ४०० रुपयांनी वाढ झाली. १,६०० रुपयांचा डबा १,९५० रुपयांना विकला जात आहे. सोयाबीनच्या डब्यामागे तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे. १,८०० रुपयांना डब्याची विक्री सुरू आहे. ठोक बाजारातील या स्थितीचा परिणाम किरकोळ बाजारातही दिसून येत आहे.

शेंगदाणा तेलाचे भाव दोन हजार ३२० रुपये डब्यावर पोहोचले आहे. गेल्यावर्षी दिवाळीच्या मुहुर्तावर सोयाबीन १३०० ते १३२० रुपये आणि शेंगदाणे तेल १७१० ते १७३० रुपये प्रति डब्बा भाव उघडले होते. तुळसी विवाहानंतर तेलाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लग्नसोहळाच्या मुहुर्तावर तेलाचे भाव वाढणार असल्याने वधूच्या वडिलांचे लग्नाचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा - स्ट्रगलर असल्याचे भासविले, लग्न करून गंडविले

भाववाढीतून मुक्तता होण्याची शक्यता धुसर

यावर्षी तेलाच्या भाववाढीतून मुक्तता होण्याची शक्यता धुसर दिसत आहे. गेल्या चार दिवसांपासून तेलाचे दर वाढलेल्या स्थितीत स्थिरावलेले आहेत. अवेळी आलेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने भाव अजून वाढतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Edible oil prices rose