शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार "अंडी हॅचर कम इनक्‍युबेटर', जाणून घ्या...

मंगेश गोमासे
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

निसर्गावर पिकांचे गणित अवलंबून असते. मात्र, लहरी वातावरणामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान होते. सततच्या नापिकीमुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागतो. या दुष्टचक्रातून बळीराजाला बाहेर काढून त्याच्या हातात वर्षभर पैसा राहावा, यासाठी शेतीला पूरक व्यवसाय निर्माण करून देणे महत्त्वाचे आहे. मात्र, पूरक व्यवसायासाठी लागणारी यंत्रसामग्रीही बाजारात महागडी असल्याने जोडधंदा करणे शेतकऱ्यांना अशक्‍य होते. त्यांची ही गरज लक्षात घेत शुभमने संशोधन करून "अंडी हॅचर कम इनक्‍युबेटर'ची निर्मिती केली.

नागपूर : सततच्या नापिकीमुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली दबत चालला आहे. अशा परिस्थितीत उदरनिर्वाहाचा पर्याय शोधण्यासाठी त्याच्या हाताशी एखादा जोडधंदा असणे काळाची गरज झाली आहे. मात्र, त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री महागडी असल्याने खरेदी करणे शेतकऱ्यांना परवडणारे नसते. अशा शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठात पशुवैद्यकीय अभ्यासक्रमातील चौथ्या वर्षाला शिकणाऱ्या शुभम मंढाले याचे संशोधन वरदान ठरले आहे. शुभमने चक्क 50 हजार रुपये किमतीचे अंडी उबवणीयंत्र केवळ तीन हजारांत तयार करून जोडधंदा करणाऱ्या शेतकऱ्यांत नवी उमेद जागविली आहे.

अवश्य वाचा - फुटपाथ दुकानदारच उभे झाले तुकाराम मुंढेंच्या विरोधात

निसर्गावर पिकांचे गणित अवलंबून असते. मात्र, लहरी वातावरणामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान होते. सततच्या नापिकीमुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागतो. या दुष्टचक्रातून बळीराजाला बाहेर काढून त्याच्या हातात वर्षभर पैसा राहावा, यासाठी शेतीला पूरक व्यवसाय निर्माण करून देणे महत्त्वाचे आहे. मात्र, पूरक व्यवसायासाठी लागणारी यंत्रसामग्रीही बाजारात महागडी असल्याने जोडधंदा करणे शेतकऱ्यांना अशक्‍य होते. त्यांची ही गरज लक्षात घेत शुभमने संशोधन करून "अंडी हॅचर कम इनक्‍युबेटर'ची निर्मिती केली.

बाजारात हे इनक्‍युबेटर सुमारे 50 हजारांत मिळते. ते शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर असते. अशा शेतकऱ्यांसाठी शुभमचे संशोधन मोठी मदत ठरणार आहे. त्याने विकसित केलेल्या यंत्राची किंमत केवळ तीन हजार रुपये आहे. अंडी उबविण्यासाठी साधारणपणे 21 दिवसांचा कालावधी लागतो. यासाठी 2500 वॉट विद्युत खर्च होते. मात्र, या यंत्रामुळे केवळ अर्धीच म्हणजे 1 हजार 254 वॉट वीज खर्च होते. त्यामुळे शेतकऱ्याला एका युनिटची किंमत केवळ चार रुपये पडणार आहे.

उल्लेखनीय म्हणजे, यात आर्द्रता आणि तापमान मोजणारे स्वयंचलित सेन्सर आणि त्याला नियंत्रित करणारे रेग्युलेटर लावण्यात आलेले आहे. शिवाय, हीटरला आतून विशेष कोटिंग करण्यात आले आहे. त्यामुळे यंत्र उत्तम काम करते. विद्युत भारनियमनामध्ये हे इनक्‍युबेटर जवळपास 1 ते 2 तास सुरू असते. शिवाय हाताळण्यासही अतिशय सोपे आहे. या वैशिष्ट्यांमुळे हे यंत्र शेतकऱ्यांसाठी निश्‍चितच वरदान ठरणार आहे.

आंतरविद्यापीठ संशोधन महोत्सवात सन्मानित

शुभमने तयार केलेले नावीन्यपूर्ण संशोधन मुंबई विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या "आविष्कार' या आंतरविद्यापीठ संशोधन महोत्सवात सादर केले होते. या संशोधनाला नावीन्य संशोधन म्हणून गौरविण्यात आले. शिवाय ग्रामायणातही ग्रामोपयोगी तंत्रज्ञानावर आधारित "ग्राम टेक मॉडेल' स्पर्धेत शुभमच्या संशोधनाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: egg incubator machine in three thousand