हायकोर्ट बारची निवडणूक लवकरच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जून 2020

सदस्यता शुल्क जमा न करणाऱ्या 400 वकिलांना निवडणूक समितीने "डिफॉल्टर' ठरवले आहे. त्यामुळे शुल्क थकविणाऱ्या सर्व वकिलांना संघटनेच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही, असा समितीने निर्णय घेतला आहे. उर्वरीत 1 हजार 806 वकिलांची यादी समितीने यापूर्वींच प्रकाशित केली आहे. कार्यकारिणीच्या 16 पदासाठी ही निवडणूक होणार असून 40 उमेदवार रिंगणात आहेत.

नागपूर : हायकोर्ट बार असोसिएशनची (एचसीबीए) बारगळलेली निवडणूक लवकरच होणार आहे, असे संकेत निवडणूक समितीच्या सदस्यांनी दिलेत. याबाबतचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. लॉकडाऊन घोषित झाल्याने निवडणूक दोनदा पुढे ढकलण्यात आली होती.

न्यायालयीन कामकाज नियमित झाल्याशिवाय यावर निर्णय होणार नसल्याचे निवडणूक समितीने स्पष्ट केले. तसेच निवडणूक घेण्यासाठी आवश्‍यक परवानगीदेखील समितीला मिळवावी लागणार आहे. संबंधित प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार नाही, असे निवडणूक समितीने स्पष्ट केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार याआधी 3 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी होणारी निवडणूक स्थगित करण्यात आली होती. त्याशिवाय सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयात केवळ तातडीच्या प्रकरणावर सुनावणीचा निर्णय घेण्यात आला.

वाचा यशोगाथा : वाहनचालक ते वकील होण्याचा प्रवास थक्क करणारा

न्यायालयीन कामकाज बंद असल्याने प्रचारासाठी उमेदवारांना अवधी मिळणार नव्हता. म्हणून अनेक उमेदवारांनी निवडणूक पुढे ढकलावी, अशा मागणीचे निवेदन सादर केले होते. सदस्यता शुल्क जमा न करणाऱ्या 400 वकिलांना निवडणूक समितीने "डिफॉल्टर' ठरवले आहे. त्यामुळे शुल्क थकविणाऱ्या सर्व वकिलांना संघटनेच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही, असा समितीने निर्णय घेतला आहे. उर्वरीत 1 हजार 806 वकिलांची यादी समितीने यापूर्वींच प्रकाशित केली आहे. कार्यकारिणीच्या 16 पदासाठी ही निवडणूक होणार असून 40 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी ऍड. प्रकाश मेघे, ऍड. भानुदास कुलकर्णी, ऍड. अरुण पाटील, ऍड. संग्राम सिरपूरकर व ऍड. फिरदोस मिर्झा यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election of High Court Bar soon