नगरपंचायत निवडणुक : राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या नजरा वार्डांच्या आरक्षणाकडे

अमर मोकाशी
Tuesday, 3 November 2020

विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपतो आहे. या कार्यकारिणीतील बरेचजण पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छूक आहेत. गतवेळचे वार्डांचे आरक्षण बदलण्याची शक्यता असल्याने या इच्छुकांना नविन वार्ड शोधावे लागतील. त्यातही ते ज्या पक्षांचे आहेत, तो पक्ष त्यांना यावेळेला उमेदवारी देतो अथवा नाही यावरही त्यांचे भवितव्य अवलंबुन आहे.

भिवापूर ( नागपूर) : पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आल्याने नगर पंचायत प्रशासनाने सार्वजनिक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मतदार याद्या अद्ययावत करणे, वार्डांचे पुनर्सीमांकन आदीं कामे आटोपल्यानंतर वार्डांचे आरक्षण ठरविले जाईल. या आरक्षणाकडे सर्वच राजकीय पक्ष व निवडणूक उमेदवारांच्या नजरा लागलेल्या आहेत. मात्र यासाठी त्यांना १० नोव्हेंबरपर्यंत वाट बघावी लागणार आहे.

विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपतो आहे. या कार्यकारिणीतील बरेचजण पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छूक आहेत. गतवेळचे वार्डांचे आरक्षण बदलण्याची शक्यता असल्याने या इच्छुकांना नविन वार्ड शोधावे लागतील. त्यातही ते ज्या पक्षांचे आहेत, तो पक्ष त्यांना यावेळेला उमेदवारी देतो अथवा नाही यावरही त्यांचे भवितव्य अवलंबुन आहे. त्यामुळे त्यांची धाकधुक वाढली आहे. १० नोव्हेंबरला वार्डांचे आरक्षण जाहीर होणार असल्याने सगळेच त्याची वाट बघत आहेत.
नगर पंचायतचा पाच वर्षांचा कार्यकाळ काही कारणांनी बराच चर्चेत राहिला. स्वच्छता अभियानांतर्गत केलेल्या साहित्य खरेदीतील भ्रष्टाचार, त्यातुन सत्ताधाऱ्यांत ऊफाळुन आलेली गटबाजी, सत्ताधारी गटाचे नगरसेवक बालाजी देवाळकर यांनी भ्रष्टाचारांचे आरोप करीत संतापुन दिलेला राजीनामा. १७ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला मुदतवाढ देण्यावरून रंगलेले सदस्यांचे नाराजीनाट्य, त्यातुनच मग फेब्रुवारी महिन्यात बोलावलेल्या सभेतील प्रस्तावावर संबंधित अभियंत्याने जुलै आगस्टमध्ये पावसाच्या पाण्यात घरोघर फिरून सदस्यांच्या घेतलेल्या स्वाक्षऱ्या, त्यासाठी वापरलेला लक्ष्मी दर्शनचा फंडा बराच चर्चेत होता. " भागते भुत कि लंगोट ही सही " असा विचार करून जास्तच्या लाभाची वाट बघण्यापेक्षा जे मिळत आहे, त्यातच समाधान मानून काहिंनी १५ वर सहमती दिली. काहिंनी मात्र स्वाभिमान दाखवत बेकायदेशीर प्रस्तावाला नकार देत " लक्ष्मी दर्शनाची " आॅफर धुडकावून लावली. हा विषय येथे बरेच दिवस चर्चेत होता. त्याने नगर पंचायतच्या इभ्रतीची लक्तरे वेशीवर टांगली गेलीत.

अन्य एक विषय चर्चिला गेला, तो म्हणजे काँग्रेस व शिवसेना आघाडीचा. सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेसने पहिल्या टर्मला शिवसेनेला सोबत घेतले. परंतु दुसऱ्या टर्मला मात्र ऐन वेळेवी बसपाशी सलगी साधत शिवसेनेला दूर लोटले. काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांच्या या खेळीची चर्चा सुद्धा बरेच दिवस कानावर पडत राहिली.
पुढील निवडणूक जानेवारीच्या उत्तरार्धात किंवा फरवरीच्या पुर्वार्धात लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने विविध राजकीय पक्षाच्या स्थानिक पुढाऱ्यांच्या हालचाली सुरू झाल्या असुन कार्यकर्त्यांना गोंजारण्याचे काम सुरू आहे.

न. पं. च्या विद्यमान कार्यकारिणीत काँग्रेस ५, शिवसेना ४, भाजप ३, बसपा ३ व दोन अपक्ष अशी सदस्य संख्या आहे. त्यापैकी वार्ड क्रमांक ११ चे नगरसेवक शंकर डडमल यांनी सेनेला जय महाराष्ट्र करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला व जि.प. च्या कारगाव सर्कलमधुन निवडणूक लढवुन विजयी झालेत. रा. काँ. ला या निवडणूकीत भोपळाही फोडता आला नव्हता. त्यांच्या सर्वच उमेदवारांना अनामती गमवाव्या लागल्या होत्या. वाचाळवीर असलेल्या रा.काँ. नेत्यांच्या बोलघेवडेपणाचा फटका निवडणुकीत उमेदवारांना बसला होता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elections of Nagarpanchayat