वीजबिलाने पळविले नागरिकांच्या तोंडचे पाणी, ही आहेत कारणे...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जून 2020

महावितरणच्या राज्यभरातील एकूण 2.30 कोटी ग्राहकांपैकी केवळ 3.65 लाख ग्राहकांनीच रिडिंग पाठविण्याचे कष्ट घेतले. अनेक इच्छुकांनी प्रयत्न करूनही तांत्रिक अडचणींमुळे रिडिंग पाठविणे शक्‍य झाले नाही. अशा स्थितीत महावितरणने मार्च, एप्रिल व मे महिन्यात सरासरी बिल एसएमएसद्वारे पाठविले. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने लोकांच्या हाताला काम नव्हते. शिवाय बिल भरणा केंद्रही बंद अशा स्थितीत बिल वसुलीही चांगलीच घसरली.

नागपूर : महावितरणने सुमारे तीन महिन्यांनंतर मीटर रिडिंग व छापील बिलाचे वाटप पुन्हा सुरू केले आहे. बिलाची रक्कम अपेक्षेपेक्षा फारच जास्त असल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ज्यादा बिलाची ओरड सर्वत्र सुरू असून, ग्राहकांमध्ये प्रचंड रोष दिसून येत आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महावितरणने 23 मार्चपासून मीटर रिडिंग व छापील बिलाचे वाटप बंद केले होते. ग्राहकांनी स्वत:हून रिडिंग पाठविण्याचे आवाहनही महावितरणने केले होते. परंतु, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

महावितरणच्या राज्यभरातील एकूण 2.30 कोटी ग्राहकांपैकी केवळ 3.65 लाख ग्राहकांनीच रिडिंग पाठविण्याचे कष्ट घेतले. अनेक इच्छुकांनी प्रयत्न करूनही तांत्रिक अडचणींमुळे रिडिंग पाठविणे शक्‍य झाले नाही. अशा स्थितीत महावितरणने मार्च, एप्रिल व मे महिन्यात सरासरी बिल एसएमएसद्वारे पाठविले. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने लोकांच्या हाताला काम नव्हते. शिवाय बिल भरणा केंद्रही बंद अशा स्थितीत बिल वसुलीही चांगलीच घसरली. 

अपयशावर मात करीत शेतकरीपुत्राने गाठले यशोशिखर, नक्‍की वाचा

महावितरणने स्थानिक प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने 1 जूनपासून प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात पुन्हा रिडिंग घेऊन छापील बिल पाठविणे सुरू केले. अद्याप छापील बिले आली नसली तरी एसएमएस येणे सुरू झाले आहे. त्यात तीन महिन्यांचे एकत्रित बिल येताच ग्राहकांची ओरड सुरू झाली. बिलाची रक्कम अपेक्षेपेक्षा फारच अधिक असल्याचा आरोप सुरू झाला आहे. तीन महिन्यांच्या बिला सरसकट वाढीव स्लॅबने बिल पाठविण्यात आले. एप्रिल, मे महिन्यात कमी युनिट तर जून महिन्यात अधिकचे युनिट जोडले गेले. सरासरी युनिटनुसार भरलेली रक्कम एकत्रित बिलातून वजा केली गेली नाही, मार्च महिन्यात विजेचे दर कमी असताना आताच्या दराने शुल्क आकारले गेले आदी आक्षेप ग्राहकांकडून नोंदविले जात आहेत. 

एकत्रित बिल भरायचे कसे ?
कोरोनामुळे तीन महिने घरीच बसून रहावे लागले. अनेकांची कामे अजूनही बंदच आहेत. अशा स्थितीत तीन महिन्यांचे आलेले भलेमोठे बिल एकाचवेळी भरायचे तरी कसे, अशी विचारणा ग्राहक उपस्थित करू लागले असून वीजबिल माफ करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. 

ग्राहकांवर अतिरिक्त भुर्दंड नाही, महावितरणचा दावा 
महावितरणने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. प्रत्यक्ष रिडिंगसह संगणीकृत बिलिंग प्रणालीद्वारे तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल स्लॅब बेनिफीटसह योग्य व अचूक दिले जात आहे. कोणताही अतिरिक्त भुर्दंड लावण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांनी वीजबिलांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. ग्राहकांनी भरणा केलेल्या बिलात एप्रिल व मे महिन्यांचा स्थिर आकार व विद्युत शुल्क वगळता उर्वरित रक्कम समायोजित करण्यात येत आहे. यासंबंधीची माहिती वीजबिलामध्ये नमूद करण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात वीजदर वाढले, लॉकडाऊनचे तिन्ही महिने उन्हाळ्याचे असल्याने सहाजिकच वीजवापर अधिक होता. यामुळे बिलाची रक्कम अधिक जाणवत असल्याची शक्‍यता महावितरणने व्यक्त केली आहे. ग्राहकांनी कोणताही संभ्रम ठेवू नये, वीजबिल दुरुस्तीसाठी कार्यालयात न जाता बिलाचा भणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electricity shock to customers