कर्मचाऱ्यांना कामावरून काढणे मालकाला भोवले; पेट्रोल पंपाची तोडफोड करून केले काचेने वार

योगेश बरवड
Saturday, 14 November 2020

आरोपी पूर्वी स्वामी नारायण मंदिरासमोरील पेट्रोलपंपावर काम करीत होते. दररोज पेट्रोलची विक्री जास्त करून हिशोब मात्र कमी पैशांचा देत होते. सुमारे दीड महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. व्यवस्थापक राकेश द्विवेदी (५२, रा. सुरेंद्रनगर) यांनी पाचही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. या प्रकाराने आरोपी चांगलेच संतापले होते.

नागपूर : कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून जुन्या कामगारांनी पेट्रोलपंपाची तोडफोड केली. सोबतच तोडलेल्या काचेने वार करीत व्यवस्थापकाला जखमी केले. ही थरारक घटना नंदनवन हद्दीतील स्वामी नारायण मंदिरासमोरील एचपी पेट्रोलपंपावर घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल उपाध्याय (२५, रा. वाठोडा, चांदमारी), प्रतीक विजय रामटेके (२०, रा. नंदनवन झोपडपट्टी), साहील प्रशांत खेडकर (२१, रा. गंगाबाई घाट रोड, भुनेश्वरनगर), अतुल पद्माकर मोहले (२०, रा. मिरे ले-आउट), पवन (२१) अशी मुख्य आरोपींची नावे आहेत.

अधिक माहितीसाठी - खासदार नवनीत राणा धडकणार मातोश्रीवर; मुख्यमंत्री पत्राला उत्तर देत नसल्याचा आरोप

नमुद आरोपी पूर्वी स्वामी नारायण मंदिरासमोरील पेट्रोलपंपावर काम करीत होते. दररोज पेट्रोलची विक्री जास्त करून हिशोब मात्र कमी पैशांचा देत होते. सुमारे दीड महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. व्यवस्थापक राकेश द्विवेदी (५२, रा. सुरेंद्रनगर) यांनी पाचही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. या प्रकाराने आरोपी चांगलेच संतापले होते.

व्यवस्थापकाला धडा शिकविण्याचा निर्धार करीत त्यांनी अन्य १० ते १५ साथीदारांच्या मदतीने गुरुवारी पंपावर धडक दिली. द्विवेदी यांनी शिवीगाळ करीत त्यांच्या केबीनचा काच फोडला. तुटलेल्या काचेचा तुकड्याने त्यांच्या हातावर वार करीत जखमी केले. पंपावर गोंधळ घातल्यानंतर सर्व आरोपी पळून गेले. याप्रकरणी द्विवेदी यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employees vandalize petrol pump