खासदार नवनीत राणा धडकणार मातोश्रीवर; मुख्यमंत्री पत्राला उत्तर देत नसल्याचा आरोप

सुरेंद्र चापोरकर 
Friday, 13 November 2020

नवनीत राणा म्हणाल्या, राज्यातील प्रामुख्याने विदर्भातील शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र मातोश्रीत बसून राज्यकारभार हाकत आहेत.

अमरावती : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व एकूणच महाविकास आघाडीचे सरकार गंभीर नसल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांचे निवेदन घेऊन दिवाळीनंतर मातोश्रीवर धडकणार असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी आज पत्रपरिषदेत सांगितले.

नवनीत राणा म्हणाल्या, राज्यातील प्रामुख्याने विदर्भातील शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र मातोश्रीत बसून राज्यकारभार हाकत आहेत. शेतकऱ्यांना मदतीचे केवळ आश्‍वासन देण्यात आले, प्रत्यक्षात मात्र तुटपुंज्या मदतीची घोषणा करण्यात आली. ती सुद्धा कागदोपत्रीच आहे. 

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

याबाबत आमदार रवी राणा तसेच आपण स्वतः मुख्यमंत्र्यांना यापूर्वी अनेकदा निवेदने दिलीत, दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र आजपर्यंत एकाही पत्राचे उत्तर देण्यात आले नाही तसेच भेटीसाठी वेळ सुद्धा देण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी पत्रपरिषदेत केला. 

आज शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही मदत पोहोचलेली नाही. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात आहे. आम्ही तसेच युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते सुद्धा यंदाची दिवाळी साजरी करणार नाही. दिवाळीनंतर म्हणजेच 15 ऑक्‍टोबरला शेतकऱ्यांसह रेल्वेने मुंबईकडे प्रयाण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

क्लिक करा - राष्ट्रवादीने चोवीस तासांत बदलला निर्णय, दुसरीकडे शिवसेना रूसली

मुख्यमंत्र्यांशी चर्चेसाठी वेळ मागण्यात आली असून त्यांनी ती दिल्यास आम्ही निवेदन देऊ, अन्यथा मातोश्रीबाहेर शेतकऱ्यांसोबत आंदोलनाला बसणार असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले. पत्रपरिषदेला जितू दुधाने, संजय हिंगासपुरे, ज्योती सैरिसे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Navneet Rana will go Matoshri after diwalli