मासे विकणारे हातावरचे पोट झाले चिंतामुक्त, वाचा कसे काय...

केवल जीवनतारे
गुरुवार, 4 जून 2020

कोरोनाला रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन आहे. अशा परिस्थितीत मांस, मच्छी खाणाऱ्यांना जे पाहिजे ते उपलब्ध होत नाही. खवय्यांना मासे उपलब्ध होत नव्हते तर मासेमारी करणाऱ्या अर्थात हातावर पोट असलेल्या मासे विकणाऱ्यांच्या हाती पैसा नव्हता.

नागपूर : मासेमारी हाच आमचा परंपरागत अधिकार असलेला व्यवसाय. पोटाची आग विझविण्यासाठी जीवघेणा उकाडा असो की, फाटलेल्या आभाळातील बरसात... या निसर्गनिर्मित संकटातून जगण्याचा संघर्ष आमच्या माथी लागला आहे. परंतु अचानक कोण कुठला कोरोना आला. सरकारनं लॉकडाउन केलं अन्‌ आमचं जगणंच थांबलं. आमच्या पोटाचं लॉकडाउन झालं. लॉकडाउनच्या काळात डोक्‍यानं इचार केला, अन्‌ आम्हाले आशेचा किरण दिसला. रोजच्यासारखे आमचे जगणे सुरू झाले. ग्राहक सेवा समजून लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या आणिबाणीच्या काळात व्हॉट्‌स ऍपवरून ऑनलाईन ऑर्डर स्वीकारून तलावातील चांगल्या प्रकारचे मासे ग्राहकांच्या घरी पोचवण्याचे काम सुरू झाले.

कोरोनाला रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन आहे. अशा परिस्थितीत मांस, मच्छी खाणाऱ्यांना जे पाहिजे ते उपलब्ध होत नाही. खवय्यांना मासे उपलब्ध होत नव्हते तर मासेमारी करणाऱ्या अर्थात हातावर पोट असलेल्या मासे विकणाऱ्यांच्या हाती पैसा नव्हता. जगण्यासाठी हातावरचे पोट चिंतेत आले. अशावेळी सामाजिक कार्यकर्ते मुकुंद अडेवार यांनी शक्कल लढवली. नागपुरातील जनतेपर्यंत घरपोच मासे पोहचवण्याची सोय करण्यासाठी सेवा केंद्र तयार केले. या सेवा केंद्राची माहिती सोशल मीडियावर प्रसारित केली.

खंडणी देण्यास विरोध केला म्हणून झाला "त्याचा' गेम

नागपुरातील विविध "व्हॉट्‌स ऍप' ग्रुपवर मासे पोहचवणाऱ्या सेवा केंद्राची माहिती मिळताच खवय्यांनी अडेवार यांच्यापर्यंत थेट ऑर्डर पोहचवल्या. मासेमारी करणाऱ्या गरीब माणसांपर्यंत हा संदेश पोहचला. तलावातील रोहू, कटला, मरल, झिंगा, अशा अतिशय चांगल्या दर्जाचे आणि तेही ताजे मासे घरपोच मिळण्यासाठी यांनी सकाळी 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत ऑर्डर घेणे सुरू झाले आणि दुपारी 1 वाजेपर्यंत घरपोच मासे देण्याचा उपक्रम सुरू झाला. अडेवार यांच्या मध्यस्थीने सुरू झालेल्या या मासे विक्री सेवा केंद्रातून गरीब मासे विकणाऱ्यांचे जगणे सुकर झाले. त्यांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

कोविड योद्धांना 10 टक्के सुट

नागपूरचे सावजी जसे प्रसिद्ध आहे, तसेच मासे खवय्यांचं शहर म्हणून परिचित आहे. इथे मासे खाणाऱ्यांची काही कमी नाही ते कुठे मिळतं आणि किती रकमेला मिळतं याचा विचार येथे केला जात नाही. मासे खायचे आणि तृप्त व्हायचं एवढाच नागपुरी खवय्यांना माहिती. त्यात मासे घरपोच मिळत असल्याने खवय्यांची ताजे मासे खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी गोकुळगंगा पशू कृषी अनुसंधान केंद्राच्या माध्यमातून सेवा केंद्र तयार झाले. सध्या हा उपक्रम नागपूरपुरता राबवण्यात आला असून, कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्यांसाठी 10 टक्के सूट देण्याचा संकल्प सामाजिक कार्यकर्ते मुकुंद अडेवार यांनी बोलून दाखवला.

घरपोच सेवा देण्याचे समाधान
लॉकडाउनमुळे गरिबांच्या तोंडचा घास हिरावला आहे. तीन महिन्यांपासून घरात चूल पेटत नाही. जगायच कसं, हा हातावरच पोट असणाऱ्यां मासे विकणाऱ्यांचा सवाल होता. यामुळेच घरपोच मासे घरपोच मासे देण्याच्या उपक्रमात ऑनलाइन पेमेंट किंवा कॅश ऑन डिलिव्हरीची सोय उपलब्ध करून गरिबांना जगण्यापुरते पैसे मिळू लागले. घरपोच सेवा देण्याचे समाधानही मिळू लागले. सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन होऊ नये याची खबरदारी घेतली. जगण्याचा नवा मार्ग मिळाला.
मुकुंद अडेवार, सामाजिक कार्यकर्ते, संघर्ष वाहिनी, नागपूर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Enthusiastic response to homemade fish sales by taking online orders