डिसेंबर अखेरपर्यंत राहणार बोर अभयारण्याचे प्रवेशद्वार लाॉकडाउनच...

अजय धर्मपुरीवार
Monday, 21 September 2020

नागपूर व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या बोर अभयारण्याचे अडेगाव प्रवेशद्वार मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. अभयारण्यातील परिसरात बोर धरणातील पाण्याचा शिरकाव झाला आहे. यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत प्रवेशद्वार लाॉकडाउनच राहणार आहे. यामुळे पर्यटन व्यवसाय मोडकळीस आला आहे.

हिंगणा (जि.नागपूर): कोरोना संक्रमणामुळे पर्यटन व्यवसायालाही फटका बसला आहे. नागपूर व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या बोर अभयारण्याचे अडेगाव प्रवेशद्वार मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. अभयारण्यातील परिसरात बोर धरणातील पाण्याचा शिरकाव झाला आहे. यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत प्रवेशद्वार लाॉकडाउनच राहणार आहे. यामुळे पर्यटन व्यवसाय मोडकळीस आला आहे. जंगल सफारीसाठी गाईड म्हणून काम करणारे आदिवासी मुले व मुलींचा रोजगार हिरावला गेला आहे.

अधिक वाचाः पालकांनो सावधान! तुमचे लाड मुलांसाठी घातक; महाराष्ट्रात सर्वेक्षणात तब्बल सव्वा लाख मुलांबाबत धक्कादायक माहिती समोर

सप्टेंबर महिना उजाडला तरीही पर्यटन बंद
बोर अभयारण्यात जंगलसफारी करता यावी, यासाठी आमदार समीर मेघे यांच्या पुढाकाराने तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते अडेगाव प्रवेशद्वार सुरू करण्यात आले. पर्यटकांचा बऱ्‍यापैकी प्रतिसाद या प्रवेशद्वारला  आहे. अभयारण्यात वाघ, बिबट, अस्वल, चितळ, सांबर यासह इतर वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. व्याघ्र दर्शनासाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. यामुळे पर्यटकांचा ओढा या अभयारण्याकडे अधिक आहे. मार्च महिन्यात कोरोना संक्रमणाचा काळ सुरू झाला. यानंतर वन्यजीव विभागाने अभयारण्य बंद करण्याचे आदेश दिले. कोरोनाचे संकट गडद होत असल्याने सप्टेंबर महिना उजाडला तरीही पर्यटन बंद आहे.

हेही वाचाः विकासकामांवरून नव्हे निव्वळ भूमिपूजनावरून झाला वाद, माजी आमदार पुत्रावर गुन्हा
 

केव्हा होईल सुरू? ‌
अडेगाव प्रवेशद्वारावरून जंगल सफारीच्या मार्गावरच बोर धरणाचा भाग लागून आहे. यावर्षी पाऊस सतत पडत असल्याने बोर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. जंगल सफारीच्या मार्गावर सात ते आठ फूट पाणी जमा झाले आहे. साचलेले हे पाणी कमी होण्यास बराच अवधी लागणार आहे. यानंतर जंगल सफारीच्या मार्गावर असलेले गवत कापावे लागणार आहे. पाण्याची परिस्थिती पाहता डिसेंबर अखेरपर्यंत अभयारण्यातील अडेगाव प्रवेशद्वार सुरू होण्याची शक्यता दिसून येत नाही.

संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The entrance to the Bor Sanctuary will remain locked till the end of December ...