कोरोनामुळे मेंदूज्वर झाल्यास मिरगीचा झटका शक्य; वाचा काय सांगातात डॉक्टर

केवल जीवनतारे
Monday, 23 November 2020

डॉ. नीरज बाहेती म्हणाले, मिरगी आजाराबाबत समाजात गैरसमज पसरले असून, डॉक्टरांचा सल्ला घेत नाही. डॉ. निर्मल सूर्या म्हणाले, कोरोनामुळे मेंदूज्वर झालेला आहे, अशा कोरोनाबाधितांना मिरगीचा झटका येऊ शकतो. मिरगी झाल्याचा संशय आल्यास लपवू नका. उपचार लवकर केल्यास मिरगीचे ७० टक्के रुग्ण बरे होतात.

नागपूर : भारतात मिरगीचा (फीटस्‌) आजार दोनशे व्यक्तींमध्ये एकाला आढळतो. मिरगी असलेल्या व्यक्तीस कोरोना होण्याची अधिक शक्यता नसते. मात्र, ज्यांना कोरोनामुळे मेंदूज्वर झालेला आहे, त्यांना प्रथमच मिरगीचा झटका येऊ शकतो, असा सूर चर्चासत्रातून पुढे आला. 

जगात पाच कोटींपेक्षा अधिक मिरगी (अपस्मार) आजाराचे रुग्ण आहेत. दरवर्षी जगात २४ लाख मिरगीच्या रुग्णांची भर पडते. यातील ८० टक्के रुग्ण हे अल्प उत्पन्न असणाऱ्या देशातील आहेत. मिरगी आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १७ नोव्हेंबर हा राष्ट्रीय मिरगी दिन साजरा केला जातो.

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

आयोजित कार्यक्रमात वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्युरोलॉजीच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम, एपिलेप्सी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. निर्मल सूर्या, मिरगी रोग तज्ज्ञ डॉ. गगनदीप सिंग, मुंबईच्या संगीता रावत, डॉ. नीरज बाहेती यांनी विचार व्यक्त केले.

डॉ. नीरज बाहेती म्हणाले, मिरगी आजाराबाबत समाजात गैरसमज पसरले असून, डॉक्टरांचा सल्ला घेत नाही. डॉ. निर्मल सूर्या म्हणाले, कोरोनामुळे मेंदूज्वर झालेला आहे, अशा कोरोनाबाधितांना मिरगीचा झटका येऊ शकतो. मिरगी झाल्याचा संशय आल्यास लपवू नका. उपचार लवकर केल्यास मिरगीचे ७० टक्के रुग्ण बरे होतात.

अधिक वाचा - चला मुलांनो, सोमवारपासून शाळेत या! ऑनलाईन बैठकीत घेतला निर्णय

हा मेंदूशी संबंधित आजार आहे. जगभरात तो वाढत आहे. पती-पत्नीच्या घटस्फोटासहित तरुणींचे लग्न न जुळण्यात मिरगी अर्थात अपस्मार कारणीभूत ठरतो. न्यूरॉलॉजिस्टकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये ५० टक्के रुग्ण डोकेदुखीचे असतात. ३० टक्के मिरगीचे असतात, असे मिरगी रोग तज्ज्ञ डॉ. गगनदीप सिंग यांनी सांगितले.

मिरगी कोणत्याही वयात होऊ शकते
मिरगी असलेल्या व्यक्तीस थोड्या वेळासाठी वर्तन, चेतना, हालचाल, समज आणि संवेदनेत बदल होतो. मेंदूच्या विकासाची विकृती, स्ट्रोक, डोके दुखणे, संक्रमण, मेंदू ट्यूमर, आनुवंशिक कारणे किंवा जन्मादरम्यान आणि नंतर मेंदू ला इजा होणे हे मिरगी होण्यास कारणीभूत ठरतात. मिरगी कोणत्याही वयात होऊ शकते. 
- डॉ. संगीता रावत,
न्यूरोलॉजी विभाग केएम हॉस्पिटल, मुंबई

क्लिक करा - ह्रदयद्रावक! चारित्र्यावर संशय; पोटात चार महिन्याचे बाळ असतानाही पूनमने गळफास लावून केली आत्महत्या

रुग्णाच्या डोक्याला इजा होणार नाही याची काळजी घ्या
मिरगी आल्यानंतर व्यक्तीच्या तोंडात काहीही घालू नका. जबरदस्तीने दात खिळी उघडण्याचा प्रयत्न करू नका. नाकाजवळ जोडे, चप्पल, कांदे आणू नका. रुग्णाच्या डोक्याला इजा होणार नाही याची काळजी घ्या. त्या रुग्णाचे कपडे सैल करा, रुग्णाला एका कडेवर झोपवा. पूर्ण जागरूकता येईपर्यंत त्या व्यक्तीबरोबर राहा. मिरगीचा अटॅक पाच मिनिटांपेक्षा जास्त राहिल्यास रुग्णाला दवाखान्यात न्यावे. 
- डॉ. चंद्रशेखर मेश्राम,
वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्युरोलॉजीच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी ग्रुप

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Epileptic seizures are possible if the corona causes meningitis