सगळा अफलातून कारभार, अभावच अभाव आणि तुटवडाच तुटवडा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

अलीकडे कामगार रुग्णालयाचे नूतनीकरण सुरू आहे. त्याच कामासोबत लिफ्ट दुरुस्तीचे काम झाल्यास रुग्णांच्या सोयीचे होईल. परंतु केवळ शाखा अभियंत्याच्या अडेलतट्टू धोरणामुळे ते काम होत नसल्याची टीका इंटकचे नेते त्रिशरण सहारे यांनी केली आहे.

नागपूर : रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, यंत्रसामुग्रीचा अभाव यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजनेच्या सोमवारीपेठेतील कामगार रुग्णालयाला लागलेली घरघर आता सोसायटी तयार झाल्यामुळे दूर होईल, अशी आशा आहे. मात्र दोन वर्षांपासून कामगार रुग्णालयातील लिफ्ट दुरुस्तीच्या प्रस्तावाला वाटाणाच्या अक्षता लावण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत अभियंत्याकडून सुरू आहे.

सविस्तर वाचा - अपमान जिव्हारी लागल्याने भाजप कार्यकर्त्याने केले असे...

सोमवारीपेठ येथील कामगार रुग्णालयातील लिफ्ट जुनी आहे. कधीही धोका होण्याची भीती लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने 2017 मध्ये लिफ्ट दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता गौरकर यांना सूचना दिली होती. त्यानुसार शाखा अभियंत्यांनी 2 लाख 89 हजारांचा प्रस्ताव तयार केला. हा निधी तत्काळ मंजूर करून धनादेश सार्वजनिक विभागाच्या विद्युत विभागाकडे 8 नोव्हेंबर 2017 रोजी हस्तांतरित केला. मात्र, दोन वर्षे उलटूनही दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यावेळी लिफ्ट तुटण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती; तरीही शाखा अभियंत्यांनी (विद्युत) या गंभीर प्रकरणाची दखल घेतली नाही. डिसेंबर 2018 मध्ये कामगार रुग्णालयात ऐन गर्दीच्या वेळी सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी लिफ्ट अचानक तुटली होती. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. यानंतर प्रशासनाने पुन्हा सार्वजनिक विभागाच्या विद्युत शाखा अभियंत्याला लिफ्ट दुरुस्तीच्या प्रस्तावासंदर्भात विचारणा केल्यानंतर सोयीचे उत्तर देऊन टाळाटाळ करणे सुरू केले.

मेडिकलच्या प्रकरणातून घ्यावा धडा
नुकतीच मेडिकलमध्ये महिनाभरापूर्वी पोर्च पडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतरही कामगार रुग्णालयातील विद्युत शाखा अभियंता मात्र लिफ्ट दुरुस्तीच्या रखडलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी करीत नसल्याचा विषय चर्चेला आला होता. अलीकडे कामगार रुग्णालयाचे नूतनीकरण सुरू आहे. त्याच कामासोबत लिफ्ट दुरुस्तीचे काम झाल्यास रुग्णांच्या सोयीचे होईल. परंतु केवळ शाखा अभियंत्याच्या अडेलतट्टू धोरणामुळे ते काम होत नसल्याची टीका इंटकचे नेते त्रिशरण सहारे यांनी केली आहे.
प्रस्ताव अद्याप फाईलबंद
राज्य कामगार विमा सोसायटी तयार झाली. यानंतर आता येथील विकासकामांना गती येण्याचे चिन्ह दिसत असतानाच कामगार रुग्णालयातील लिफ्टच्या दुरुस्तीचा 2 लाख 89 लाख 952 रुपयांचा प्रस्ताव अद्याप फाईलबंद आहे. हे काम न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.
त्रिशरण सहारे, अध्यक्ष, विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय आरोग्य विभाग कर्मचारी संघटना, नागपूर.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ESIC Hospital in Nagpur is on oxygen