नागपूर ग्रामीण ब्रेकिंगः अखेर विहिरीत पडलेला एक मूषक ठरला ‘त्या’ तिघांचा काळ ...

संदीप गौरखेडे
Wednesday, 19 August 2020

श्री गणेशाच्या स्थापनेत त्याचे महत्व असल्यामुळे त्याचे स्थान पूजेत आबाधित असते. परंतू हा मूषकच कधीकाळी कोणाच्या मृत्यूचे कारण ठरत असेल तर…,चूक तशी त्याचीही नाही. ‍त्यांच्या मृत्यूचे निमित्त मात्र मूषकाचे. त्या गरीब मजुरांच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या मुशकामुळे तिघांना कसा काय जीव गमवावा लागला?

कोदामेंढी (जि.नागपूर) : विघ्नहर्त्या श्री गणेशाचे आगमण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. श्रीगणेशाचे प्रिय वाहन मूषक. गणेशाच्या स्थापनेत त्याचे महत्व असल्यामुळे त्याचे स्थान पूजेत आबाधित असते. परंतू हा मूषकच कधीकाळी कोणाच्या मृत्यूचे कारण ठरत असेल तर…,चूक तशी त्याचीही नाही. ‍त्यांच्या मृत्यूचे निमित्त मात्र मूषकाचे. त्या गरीब मजुरांच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या मुशकामुळे तिघांना कसा काय जीव गमवावा लागला? वाचा...

अधिक वाचाः फक्त वचन द्या मालक, मी कत्तलखान्यात मरणार नाही

विहिरीत अखेर काय असे घडले?
सगळीकडे तान्ह्या पोळ्याचा आनंदोत्सव साजरा करीत असताना शेतातील विहिरीत तीन मजुरांचा  गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे गावात शोककळा पसरली आहे.  विहिरीत उंदीर दिसल्याने त्याला काढण्यासाठी विहिरीत उतरल्याने प्रथम एकाचा आणि त्यानंतर त्याला वाचविण्यासाठी उतरल्याने दोघांचा, अशाप्रकारे विहिरीत उंदराला वाचविण्याच्या बेतात तिघांचा बळी गेला.आकाश भोजराज पंचबुद्धे (वय २७), विनोद प्रभू बर्वे (वय ३७) आणि गणेश मुन्नीलाल काळबांडे (वय२८,तिघेही राहणार वाकेश्वर) अशी त्या मृतांची नावे आहेत. नेहमीप्रमाणे  तिघेही मजूर बद्रीनारायण  नेहरू सपाटे यांच्या शेतात धानाला रासायनिक खत देण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास शेतातील विहिरीत उंदीर दिसल्याने एक मजूर उंदराला काढण्याकरिता विहिरीत उतरला. मात्र तो बाहेर निघत नसल्याने त्याला काढण्याकरिता दुसरा आणि तिसरा मजूर विहिरीत उतरला. मात्र विहिरीत गॅस असल्याने तिघांचाही गुदमरून मृत्यू झाला.

अधिक वाचाः मायबाप सरकार थोडासा उजेड आमच्याबी जिंदगीत पडू द्या !

ते तिघेही होते कुटुंबातील कर्ते
ही घटना गावात आणि परिसरात वाऱ्यासारखी पसरली. लोकांचे लोंढे घटनास्थळावर पोहचले. घटनास्थळाला जणूकाही जत्रेचे स्वरूप आले.  घटनेची माहिती अरोली पोलिसांना मिळताच ठाणेदार विवेक सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश चाबुकस्वार ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तिघांचेही मृतदेह विहिरीतून मोठ्या शिताफीने काढून घेतले. तिघेही मृत कुटुंबातील कर्ते असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. विहिरीत गॅस तयार झाल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच आणि मृतदेह बघताच कुटुंबातील सदस्यांनी हंबरडा फोडला. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता रामटेक येथे पाठविण्यात आले. उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल. पुढील तपास ठाणेदार विवेक सोनवणे करीत आहेत.

अधिक वाचाः अरे व्वा! पोलिसांची तर मज्जाच मज्जा...वाचा सविस्तर
 

विहिरीत असा होतो गॅस तयार
शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक खते आणि केमिकलची फवारणी केली जाते. शेतातील केमिकलयुक्त पाणी झऱ्यामार्फत विहिरीत जात असते. रासायनिक खते आणि केमिकल यामुळे विहिरीत गॅस तयार होतो. त्याचप्रमाणे विहिरीचा उपसा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात गॅस तयार झालेली असते. आणि याच गॅसमुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण कळेल
तिघेही मजुरीकरिता शेतात आले  होते. विहिरीत उंदीर दिसल्याने  त्याला काढण्यासाठी एक विहिरीत उतरला आणि त्यानंतर दुसरा आणि तिसरा उतरला. मात्र तिघांचाही गुदमरून मृत्यू झाला. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल.
विवेक सोनवणे, ठाणेदार अरोली

 

संपादन  : विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eventually a mouse fell into the well and became the time of 'those' three.