परीक्षेला जाताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स...

exam
exam

नागपूर : 
अ) बरेच विद्यार्थी परीक्षेच्या आदल्या रात्री खूप जागरण करून अभ्यास करतात. 2-3 तासांचीदेखील नीट झोप त्यांना मिळत नाही. हे टाळले पाहिजे. त्यामुळे ज्या दिवशी पेपर असेल, त्याच्या आदल्या रात्री पुरेशी झोप घ्या. 

ब) अनेक विद्यार्थ्यांना पेपरच्या वेळेपर्यंत अभ्यास करण्याची सवय असते. परीक्षा हॉलमध्ये इनव्हिजिलेटर जोपर्यंत पुस्तक ठेवायला सांगत नाही, तोपर्यंत मुले वाचत असतात. समजा, तुम्हाला एखाद्या शिबिरात वृक्षारोपण करण्यासाठी 100 खड्डे खोदायला सांगितले व 4-5 तास मेहनत करून तुम्ही खड्डे खोदले. तुम्ही खूप थकून गेलेले आहात. अशा वेळी खड्डे खोदायचे काम झाल्यावर लगेच तुम्हाला संपूर्ण ग्राउंडमध्ये पाणी शिंपडायला सांगितले तर तुम्ही मान्य करणार नाही. तुम्ही म्हणाल,

सर, खड्डे खोदून आम्ही खूप थकलो आहोत. पाणी शिंपडण्याचे काम आम्ही संध्याकाळी करू. आम्हाला आता विश्रांती हवी आहे.

शारीरिक थकव्याची आपल्याला जाणीव होते. पण मेंदू थकला तरी त्याची जाणीव होत नाही. पेपरच्या वेळेपर्यंत अभ्यास करून आपण मेंदूला थकवतो आणि थकलेल्या मेंदूला पुन्हा 3 तास पेपर सोडवायला सांगतो. असं जर आपण करत असू तर चांगला परफॉर्मन्स देऊच शकणार नाही. त्यामुळे पेपरच्या किमान 3-4 तास आधी अभ्यास पूर्णपणे बंद केला पाहिजे. मग या 3-4 तासांत तुम्ही टीव्ही पाहणे, गाणी ऐकणे, घरची इतर कामे करणे यातले काहीही केले तरी चालेल. 

क) परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर पेपर सुरू होण्यापूर्वी 10-15 मिनिटांचा वेळ तुमच्यासाठी मोकळा असतो. या वेळात जर तुम्ही 2 मिनिटे डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रित केले, तर मेंदू अधिक रिलॅक्‍स होईल व तुम्हाला अधिक चांगले आठवेल. 

ड) बऱ्याचदा विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे येत असतात, पण वेळच पुरत नाही. त्याकरिता प्रत्येक प्रश्नाला आपण किती वेळ देऊ शकतो याचे नियोजन केले पाहिजे. समजा, 3 तासांत 10 प्रश्न सोडवायचे असतील तर 18 मिनिटे एका प्रश्नासाठी मिळतात. पण प्रत्येक प्रश्न 17 किंवा 16 मिनिटांत सोडवा व शेवटची 10 मिनिटे पूर्ण पेपर पुन्हा एकदा तपासण्यासाठी शिल्लक ठेवा. 

इ) बरेच विद्यार्थी प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ती पूर्ण कधीच वाचत नाहीत. क्रमवार प्रश्न सोडवत जातात. असे न करता प्रश्नपत्रिका पूर्ण वाचावी व तेच प्रश्न आधी सोडवावेत, जे तुम्हाला खूप चांगले येतात. असे केल्याने परीक्षकांच्या मनात तुमची चांगली प्रतिमा तयार होईल व तो सढळ हाताने मार्क्‍स टाकेल. 
समजा, सुरुवातीच्याच प्रश्नांची उत्तरे नीट जमली नसतील तर परीक्षकाचे तुमच्याबद्दलचे मत वाईट होईल व तो कमी मार्क्‍स टाकेल. केवळ प्रश्न सोडवण्याचा सिकवेन्स जरी बदललात तरी प्रत्येक पेपरमध्ये 5 -10 मार्क्‍स सहज वाढू शकतात.

सर्वांत प्रथम तोच प्रश्न सोडवा, जो तुम्हाला सर्वांत चांगला जमतो. त्यानंतर उरलेले चांगले जमणारे प्रश्न सोडवा. शेवटी न जमणारे 2-3 प्रश्न उरतील. समजा, तुम्ही त्या प्रश्नांचा अभ्यास केला असेल, पण तुम्हाला ते आठवत नसतील तर पेन खाली ठेवा. एक मिनिट शांत बसा. रिलॅक्‍स व्हा. डोक्‍यातील सर्व विचार काढून टाका. वर्गात शिकवलेले कधीतरी एकदाच वाचलेले, मित्रांसोबत डिस्कस केलेले इ. आठवायला लागेल व तुम्ही लिहू शकाल. 

फ) पेपर सोडवून परत आल्यावर त्या पेपरमध्ये किती मार्क्‍स मिळतील याची टोटल मुळीच करू नका. परीक्षेच्या 3 तासांत आपण टेन्शनमध्ये असतो. टोटल करताना पेपरमध्ये नेमके काय लिहिले ते आठवत नाही. आपण कमी मार्क्‍स मोजतो. टोटल कमी भरते आणि मग आपला आत्मविश्वास कमी होतो. या टिप्स विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवल्या तर त्यांचा परीक्षेतील परफॉर्मन्स सुधारू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com