अखेर जमलं भाऊ! तिसऱ्या दिवशी नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत; विद्यार्थ्यांना दिलासा 

मंगेश गोमासे 
Saturday, 10 October 2020

दरम्यान चारही टप्प्यातील परीक्षा सुरळीत पार पडल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले. यावेळी दुसऱ्या टप्प्यातील बीएच्या परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्याच्या भाषेत बदल झाल्याने त्रास सहन करावा लागला

नागपूर ः दोन दिवसाच्या गोंधळानंतर तिसऱ्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या चारही टप्प्यातील परीक्षा सुरळीत पार पडल्या. यामुळे विद्यापीठाला थोडाफार दिलासा मिळाला आहे.

विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांची सुरुवात ८ ऑक्टोबरपासून झाली. मात्र, पहिल्याच दिवशी विद्यापीठाच्या ॲपबाबत तांत्रिक अडचणी आल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्याचे दिसून आले. यानंतर सलग दुसऱ्या दिवशी विद्यापीठाचे सर्व्हर बसल्याने तीन टप्प्यातील परीक्षा स्थगित करण्यात आल्यात. यामुळे विद्यापीठाची चांगलीच नाचक्की झाली. मात्र, दोन दिवस झालेल्या चुकांमधून धडा घेत, विद्यापीठाने सर्व्हरसह इतर सगळ्या समस्यांचे समाधान शोधून काढीत, आज नव्या जोमाने परीक्षा घेण्यास सुरुवात केली. 

हेही वाचा - कोरोनाच जबाबदार! केस कापण्याच्या किंमतीत झाली तब्बल दुप्पट वाढ; दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर

दरम्यान चारही टप्प्यातील परीक्षा सुरळीत पार पडल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले. यावेळी दुसऱ्या टप्प्यातील बीएच्या परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्याच्या भाषेत बदल झाल्याने त्रास सहन करावा लागला. मात्र, विद्यापीठाने काही वेळातच ही समस्या सोडविली. 

यानंतर काही विद्यार्थ्यांना लॉगीन करण्यात समस्या आल्याचे दिसून आले. त्यातही विद्यापीठाने तातडीने काम करीत समस्या दूर केल्यात. एकंदरीत, आजचा दिवस विद्यापीठासाठी चांगला निघाल्याने अधिकारी आणि कर्मचारी सुखावले. आज पहिल्या टप्प्यात १९१, दुसऱ्या टप्प्यात ४८०, तिसऱ्या टप्प्यात १६८१ तर चौथ्या टप्प्यात ६८० विद्यार्थी अशा एकूण ३ हजार ३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

ठळक बातमी - मृत्यू झाल्यानंतर या धर्मात चक्क गिधाडांच्या स्वाधीन केला जातो मृतदेह; अनोख्या पद्धतीने करता अंत्यसंस्कार

१५ मिनिटाआधी सुरू करणार परीक्षा

विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना ॲपमध्ये लॉगीनसाठी वेळ लागत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे परीक्षा जवळपास दहा ते पंधरा मिनिटे उशिरा सुरू होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या परीक्षेपासून परीक्षा १५ मिनिट आधीपासून सुरू करणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले. त्यामुळे सर्व्हरवर येणारा भार कमी होण्यास मदत मिळणार असल्याचेही ते म्हणाले. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: exams of Nagpur university are successful on third day