बापरे! आंतरराष्ट्रीय धावपटूवर आली जेवणासाठी रांगेत लागण्याची वेळ

ज्योती चौहान
ज्योती चौहान

नागपूर : लॉकडाउनमुळे एकीकडे गोरगरीब कामगार व रोजमजुरांवर उपासमारीची वेळ आली असतानाच खेळाडूही या दुष्टचक्रातून सुटू शकले नाहीत. आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती चौहान याचे ताजे उदाहरण आहे.


कोरोनाने कमाईचे साधन हिरावून नेल्याने चौहान परिवार सध्या बेरोजगार असून दोन वेळच्या खाण्याचे वांधे झाले आहेत. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी ज्योतीच्या परिवाराला नाइलाजाने अन्नदानाच्या रांगेत उभे राहावे लागते आहे. नागपूरपासून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या इसासनी येथील पंचशीलनगर झोपडपट्‌टीत ज्योती व तिचे आईवडील राहतात. ज्योतीचे वडील जंगबहादूर मिस्त्रीकाम करतात, तर आई सुीशला घरगुती काम करते. लॉकडाउनमुळे कामे बंद असल्यामुळे ज्योतीचे वडील सध्या बेरोजगार होऊन घरीच बसले आहेत. क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्यामुळे ज्योतीही महिन्याभरापासून घराबाहेर पडलेली नाही. वडिलांच्या हाताला काम नाही आणि ज्योतीलाही "जॉब' नाही आणि घरात खाणारे पाच जीव आहेत.

चौहान परिवाराने आतापर्यंतच्या जमापुंजीच्या भरवशावर कसेबसे दिवस ढकलले. मात्र, आता एकेक दिवस कठीण जात आहे. अशा परिस्थितीत आमदार समीर मेघे यांनी सुरू केलेल्या भोजनदानावरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. येथील इसासनी, भीमनगर, पंचशीलनगर या कामगारबहुल वस्तीत गेल्या काही दिवसांपासून भोजनदान वितरण सुरू आहे. भोजन वाटपप्रसंगी येथे ज्योतीची आई किंवा लहान बहीण रांगेत लागून जेवण घेते. लाजेखातर ज्योती मात्र तिथे जात नाही. लॉकडाउनच्या काळात गोरगरिबांना अन्नदान, भोजनदान किंवा आर्थिक मदत होणे, नवलाईची बाब नाही. मात्र, एका आंतरराष्ट्रीय धावपटूच्या परिवारावर अशी वेळ यावी, याचे दुःख व आश्‍चर्य वाटते.

भोपाळच्या "सेंटर फॉर एक्‍सलन्स'मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या 25 वर्षीय ज्योतीने आर्थिक चणचण व विपरीत परिस्थितीवर मात करीत जिल्हा, विभागीय, राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पदके जिंकलीत. गतवर्षी (जुलै 2019 मध्ये) इटली येथे झालेल्या "वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स'मध्येही तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. स्पर्धांमध्ये मिळालेल्या रोख पुरस्कारांतून ती आपल्या परिवाराला हातभार लावते. चमकदार कामगिरीनंतरही अद्याप स्पोर्टस कोट्यातून नोकरी मिळू न शकल्याचे दुःख ज्योतीला सतावत आहे. तिने नोकरीसाठी रेल्वे, इन्कम टॅक्‍स, कस्टम्स, सीआयएसएफसह ठिकठिकाणी हातपाय मारले. दुर्दैवाने कुणीही माझ्या "टॅलेंट'ची कदर केली नसल्याची खंत ज्योतीने बोलून दाखविली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com