विविध बँक, सावकाराच्या कर्जाच्या दबावात शेतकऱ्याने संपवले जीवन

रूपेश वनवे
Monday, 9 November 2020

विविध बँकेचे कर्ज, पीकावर आलेले विविध रोग व नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे धान पीक नष्ट झाले होते. त्यामुळे अस्वस्थ होऊन त्यांनी हा निर्णय घेतला. महादुला येथे भूमापन ०.७३ हेक्टरवर त्यांची शेती आहे.

शिवनी भोंडकी (जि. नागपूर) : शेतकऱ्यांवर अधूनमधून विविध रूपाने संकटे कोसळत असतात. कधी अस्मानी तर अवकाळी. पाऊस, ओला व सुका दुष्काळ, पिकांवर येणारे रोग आदींमुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत. त्यातून शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होतात. अशीच घटना रामटेक पोलिस ठाण्याअंतर्गत महादुला येथे सात नोव्हेंबरच्या रात्री अकराच्या सुमारास घडली.

गावातील शेतकरी अश्विन मारोतराव काठोके (वय ४४) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. विविध बँकेचे कर्ज, पीकावर आलेले विविध रोग व नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे धान पीक नष्ट झाले होते. त्यामुळे अस्वस्थ होऊन त्यांनी हा निर्णय घेतला. महादुला येथे भूमापन ०.७३ हेक्टरवर त्यांची शेती आहे.

त्यांच्यावर एक लाख पंचवीस हजार रुपयाचे व बॅंक ऑफ इंडिया शितलवाडी शाखेतील पीक कर्ज, पत्नीच्या नावे बचत गटामार्फत उचललेले कर्ज, गावातील काही लोकांकडून घेतलेली हातउसणे व बियाणे दुकानदार यांची उधारी होती. त्यांच्या मागे पत्नी रेखा अश्विन काठोके, दोन मुले, तेजस (वय १६), प्रणय ( वय १५) असा परिवार आहे.

कॉंग्रेसचे उदयसिंग उर्फ गज्जू यादव, पालकमत्री डॉ. नितीन राऊत यांनी काठोके यांच्या घरी जाऊन कुटुंबीयाची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. शासकीय मदत मिळवून देण्याची हमी दिली. यावेळी उपसरपंच दिनेश काठोके, सुशील रहाटे, भागवत काठोके, शरद ङडुरे, महेंद्र काठोके, सोमाजी डडुरे, राजेश काठोके, गेंदलाल मोहने, बंडू काठोके, पंकज काठोके, उमेश मोहने उपस्थित होते.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer commits suicide in Nagpur Gramin