VIDEO: बळीराजाने उभ्या कपाशीवर फिरवले ट्रॅक्टर; लाल्या, बोंडअळीमुळे प्रचंड नुकसान  

विजयकुमार राऊत 
Wednesday, 18 November 2020

एखाद्या पिकासाठी शेतकऱ्यांनी अतोनात मेहनत घ्यायची. रात्रीचा दिवस करायचा, घाम गाळायचा आणि त्याचे उत्पन्न शून्य मिळत असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचे, असा प्रश्न उमरेड तालुक्यातील चांपा हळदगाव परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.

चांपा (जि. नागपूर) : उमरेड तालुक्यातील हळदगाव येथील भोजराज हाते यांनी दोन एकरांत कपाशीची लागवड केली. एकरी 25 हजारांचा खर्चही केला. कपाशीच्या प्रत्येक झाडाला तीन ते चार बोंड लागले. परंतु लाल्या आणि बोंड आळीने संपूर्ण पीक नेस्तनाबूत केले. हजारो रुपये खर्च करून शून्य उत्पन्न मिळाल्याने हाते यांनी आपल्या उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवला. 

एखाद्या पिकासाठी शेतकऱ्यांनी अतोनात मेहनत घ्यायची. रात्रीचा दिवस करायचा, घाम गाळायचा आणि त्याचे उत्पन्न शून्य मिळत असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचे, असा प्रश्न उमरेड तालुक्यातील चांपा हळदगाव परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. नगदी पीक म्हणून सोयाबीन आणि कपाशीकडे शेतकरी मोठ्या आशेने बघतात. परंतु त्याच पिकाने धोका दिल्याने शेतकरी पुरता हादरून गेला आहे. 

हेही वाचा - महावितरणचा खिसा रिकामाच, फक्त नागपूर विभागातील थकबाकी सात हजार कोटी

रोगराई आणि अतिपावसामुळे सोयाबीन हातचे गेले. ऐन दिवाळीत कपाशीवर शेतकऱ्यांची भिस्त होती. त्यालाही लाल्या, बोंडअळीचा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक कोलमडले आहे. 

 

 

रोगराईमुळे शेतकऱ्यांना सोयाबीन काढणेसुध्दा परवडले नाही. अतिवृष्टीमुळे उमरेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी लावलेल्या सोयाबीन पिकावर खोडकिडी व येलो मोझॅक रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळाली नाही तर भविष्यात भयावह स्थितीला सामोरे जावे लागेल, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. 

अतिपावसामुळे हाते यांच्या शेतातील सोयाबीन सोंगण्याच्या अवस्थेतच राहिला नाही. कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केले. त्यामुळे उत्पन्न शून्य अशी अवस्था झाली आहे. आपली विवंचना त्यांनी सकाळकडे व्यक्त केली. 

क्लिक करा - गुरुजींच्या वस्तीत पक्ष्यांची शाळा: भल्या पहाटे हजारो पक्ष्यांची हजेरी

पिकाच्या लागवडीसाठी उसनवारीने घेतलेले कर्ज कसे फेडायचे, वर्षभराचे नियोजन कसे करावे असा प्रश्न त्यांना पडला. उत्पन्न होण्याची आशा धुळीस मिळाल्याने शेतकऱ्यांसाठी जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे पीक हातचे गेल्याने खचून गेलेल्या शेतकऱ्यांना सरकारने कुठलाही सर्व्हे न करता तत्काळ सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी चांपा हळदगाव परिसरातील शेतकरी करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer destroy his cotton crops by tractor