सौरपंपाच्या अमानत रकमेसाठी शेतकऱ्यांवर खेटा घालण्याची वेळ

योगेश बरवड
Monday, 5 October 2020

शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीज मिळावी यासाठी सौर कृषीपंपाची योजना आखली. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. उमरेड तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पंपासाठी अर्ज केले. पण, अद्याप पंप मिळू शकले नाही

नागपूर : शेतीत ओलिताची सुविधा व्हावी यासाठी सरकारनेच सौरपंप वाटपाचा कार्यक्रम घोषित केला. शेतकऱ्यांनी मागणीनुसार पैशाचा भरणा केला. पण, कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कटल्याने मिळालेल्या लाभावर पाणी सोडावे लागले. आता महवितरणकडे अडकलेले पैसे परत मिळावे यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अधिकारी त्यांना कार्यालयात वारंवार खेटा घालाण्यास भाग पाडत आहेत. प्रामुख्याने उमरेड विभागात हा प्रकार प्रकर्षाने दिसून येत असून शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. 

शेतीसाठी पाण्याची सोय झाली की पाण्याची मोटर आणि वीजजोडणीची तजवीज करावी लागते. डिमांड भरूनही वेळेवर वीजजोडणी मिळेलच याची शाश्वती नसते. मागील सरकारने ही अडचण सोडविण्यासह शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीज मिळावी यासाठी सौर कृषीपंपाची योजना आखली. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. उमरेड तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पंपासाठी अर्ज केले. पण, अद्याप पंप मिळू शकले नाही. त्यात कोरोनाने थैमान घातले. अडचणीच्या या काळात महावितरणकडे अडकून पडलेले पैसे परत मिळावेत म्हणून शेतकऱ्यांनी प्रयत्न सुरू केले. उमरेड तालुक्यातील शेडेश्वर येथील शेतकरीही त्यापैकीच आहेत. उमरेडपासून हे गाव ३५ ते ४० किलोमीटर अंतरावर आहे. 

स्पा, सलूनच्या आड देहव्यापार करणाऱ्या पाच तरुणी ताब्यात

पैसे परत घेण्यासाठी उमरेडच्या विभागीय कार्यालयात जाण्याची सूचना त्यांना करण्यात आली. पण, येथील अधिकारी सातत्याने टाळाटाळ करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. कधीही गेले तरी ‘मला हेच काम आहे का, नंतर या’ हे ठरलेले उत्तर त्यांच्याकडे मिळते. पैसे मिळतील या आशेने शेतकरी जवळचे पैसे आणि वेळ खर्ची घालून कार्यालयाच्या नियमित वाऱ्या करीत आहेत. दहा ते बारा शेतकऱ्यांचे पैसे असे अडकून असल्याची माहिती आहे.

लॉकडाऊनच्या काळात महावितरणने राज्यात २ लाख २२ हजार ग्राहकांना नवीन जोडणी दिली. अशीच तत्परता अमानत रक्कम देण्यासाठी का दाखविली जात नाही, अशी उद्विग्नता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers awaited for refund