शेतकऱ्यांनी दिले सोयाबीन पिकाला प्राधान्य; मात्र, अतिवृष्टी व किडीमुळे पीकच गेले हातातून

नीलेश डोये
Monday, 9 November 2020

शेतातील सोयाबीन न कापता त्यावर थेट ट्रॅक्टर चालवले. काहींनी रोटावेटर मारला. त्यामुळे यंदाही शेतीचा व्यवसाय तोट्याचा ठरला. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील कोरडवाहू क्षेत्रात ६८ हजार ९६८.२५ हेक्टरमध्ये सोयाबीन पिकाची लागवड झाली.

नागपूर : यंदा सोयाबीन पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. अतिवृष्टी आणि किडीमुळे संपूर्ण पीकच हातातून गेले. नागपूर जिल्ह्यात ६८ हजार ९६८ हेक्टरमधील सोयाबीन पीक किडीने फस्त केले.

मागील वर्षीचा अनुभव पाहता यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला प्राधान्य दिले. त्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली. परंतु, यंदाही त्यांच्या पदरी निराशाच आली. सततच्या पावसाने शेतात पाणी जमा राहिले. यामुळे सोयाबीन किडीचा प्रादुर्भाव झाला. सोयाबीनची पाने पिवळी पडली. काही ठिकाणी सोयाबीनमधील दाणा भरला नसून ते काळे पडले. हाती काही मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी कापणीच टाळली.

शेतातील सोयाबीन न कापता त्यावर थेट ट्रॅक्टर चालवले. काहींनी रोटावेटर मारला. त्यामुळे यंदाही शेतीचा व्यवसाय तोट्याचा ठरला. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील कोरडवाहू क्षेत्रात ६८ हजार ९६८.२५ हेक्टरमध्ये सोयाबीन पिकाची लागवड झाली. या संपूर्ण क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. यामुळे ९१ हजार ५१३ शेतकरी बाधित झाले असून, ४६ कोटी ८९ लाख ८४ हजार १०० रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाकडून शासनास मदतीसाठी पाठविण्यात आला.

हेही वाचा - अहोऽऽ हे काय केलं? आता कशाला सोडलं पाणी; तुमच्या चुकीमुळे दिवाळी गेली ना अंधारात

९,७२१ हेक्टरमधील फळपिकांचे नुकसान

किडीमुळे सोयाबीनसोबत संत्रा आणि मोसंबी या फळपिकांची हाणी झाली. ९७२१.११ हेक्टरमधील फळपिके हातची गेली. यात २६३६.१९ हेक्टर संत्रा तर ७०८५.०१ हेक्टर मोसंबीचा समावेश आहे. १८,१४८ शेतकरी यामुळे बाधित झाले असून, त्यांना मदतीसाठी १७ कोटी ४९ लाख ७९ हजार ९८० रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Diwali in darkness due to insects