खंडित वीज पुरवठ्यामुळे पुन्हा संकट, रब्बी हंगाम प्रभावित होण्याची भीती 

नरेंद्र चोरे
Tuesday, 10 November 2020

खरीप संपल्याने शेतकरी सध्या रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत. पावसाळा संपल्याने व जमीन कोरडी झाल्याने कापूस, तूर, संत्रा व मोसंबी इत्यादी पिकांना पाण्याची नितांत गरज आहे.

नागपूर  : लोडशेडिंग, कमी-जास्त व्होल्टेज आणि दुरुस्तीच्या नावावर वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे कळमेश्वर व कोहळी परिसरातील शेतकरी सध्या कमालीचे त्रस्त आहेत. नियमित वीजपुरवठ्याअभावी ओलित करण्यात अनेक अडचणी येत असून, ते विद्युत विभागावर नाराज आहेत.

खरीप संपल्याने शेतकरी सध्या रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत. पावसाळा संपल्याने व जमीन कोरडी झाल्याने कापूस, तूर, संत्रा व मोसंबी इत्यादी पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. शिवार गहू, चणा, जवस, भाजीपाला व इतरही पिकांचीही लागवड करायची आहे. त्यामुळे ओलित करण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसभर वीजपुरवठा आवश्यक आहे. 

जाणून घ्या - आमदार होईल म्हटल्यावर लोकांनी टिंगलटवाळी केली अन् आता शिक्कामोर्तब होताच त्यांनाच आलं भरून
 

कळमेश्वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिवसा वीजपुरवठा राहात नसल्याने शेतकऱ्यांना मोठी अडचण जात आहे. बहुतांश वेळा रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा असतो. अशा परिस्थितीत अंधारात कडाक्याच्या थंडीत ओलित करणे शक्य नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे रब्बी हंगामावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

अनियमित वीज पुरवठ्याचा सर्वाधिक फटका कळमेश्वर, कोहळी, खापरी, उदगी व आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना बसतो आहे. यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे आधीच सोयाबीन व कापूस या दोन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शिवाय रोगराईमुळे संत्रा व मोसंबीचीही मोठ्या प्रमाणावर गळ सुरू आहे. 

या दुहेरी संकटामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आता त्यांची सर्व भिस्त रब्बी हंगामावर टिकून आहे. एकीकडे राज्य सरकार शेतकऱ्यांना चोवीस तास अखंडित वीजपुरवठा देण्याची भाषा बोलते. प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे आहे. आम्हाला केवळ दिवसभर थ्री फेज अखंडित वीज पुरवठा मिळावा, एवढीच येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.
 
संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers suffer due to frequent power outages