मध्यरात्री कोविड केअर सेंटरमध्ये माजली खळबळ; काय झाले असे?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

कोविड केअर सेंटरमध्ये तहसील कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालत असेल तर या प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. 

हिंगणा (नागपूर) : वानाडोंगरी येथील कोविड केअर सेंटरमध्ये तहसील कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातला. या घटनेमुळे क्वारंटाइन असलेल्या रुग्णांमध्ये खळबळ माजली. 

हिंगणा एमआयडीसी परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. तालुक्‍यात 18 कंटेनमेंट झोनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 94च्या घरात पोहोचली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वानाडोंगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात कोविड केअर सेंटर प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले. अमरनगर व वानाडोंगरी परिसरात कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या 562 व्यक्तींना क्वारंटाइन करून या सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. 1 जुलै रोजी 28 जणांना स्वास्थ्यपूर्ण निरोप देण्यात आला. 

तहसील कार्यालयातील एक कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. यानंतर तहसील कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी स्वतःहून होम क्वारंटाइन म्हणून दाखल झाले. 2 जुलै रोजी रात्री 12 वाजतादरम्यान मद्यधुंद अवस्थेत या अधिकाऱ्याने गोंधळ घातल्याचे समजते. वानाडोंगरी कोविड केअर सेंटरमधील साहित्य परिसरात फेकले. 

गोंधळ जास्तच वाढल्याने नोडल अधिकाऱ्याने तालुका कोविड केअर समितीच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती दिली. या अधिकाऱ्याने नोडल अधिकाऱ्याला त्यांना समजावून तंबी देण्याची सूचना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्याचा गोंधळ पाहून क्वारंटाइन रुग्णांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले. रात्री एक वाजताच्या दरम्यान गोंधळ शांत झाला. 

हेही वाचा : हुंडा दिला नाही म्हणून तो पत्नीशी करायचा अनैसर्गिक कृत्य 

या प्रकरणाची उपविभागीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणी तहसीलदारांना खडे बोल सुनावण्यात आले. तहसीलदारांनी या अधिकाऱ्याला सूचना वजा इशारा देऊन प्रकरण शांत केल्याची चर्चा आहे. कोविड केअर सेंटरमध्ये तहसील कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालत असेल तर या प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear among quarantine patients at Covid Care Center