शहरात महिला चोरांची दहशत, बसमधील प्रवाशांकडून पळवला लाखोंचा मुद्दमाल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 February 2020

मंगळवारी 3 ठिकाणी चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. तिन्ही घटनांमध्ये पोलिसांनी अज्ञात महिला चोरांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

नागपूर : शहरात महिला चोरांच्या टोळीने बसमध्ये धुमाकुळ घातला आहे. जवळपास दररोजच बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दागिने आणि पैसे चोरी होत आहेत. मात्र, हे थांबविण्यासाठी पोलिस विभागाने कोणतेही ठोस पाऊल उचलल्याचे दिसून येत नाही. हेच कारण आहे की महिला चोरांची हिंमत वाढत चालली आहे. मंगळवारी 3 ठिकाणी चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. तिन्ही घटनांमध्ये पोलिसांनी अज्ञात महिला चोरांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

सविस्तर वाचा - दत्रात्रेयनगरात दुहेरी हत्याकांड, मामा भाचीची हत्या

पहिल्या घटनेत प्रतापनगर पोलिसांनी समुद्रपूर, वर्धा निवासी संगीता मेघश्‍याम ठाकरे (47) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास संगीता स्नेहनगर बस थांब्यावरून जांभला जाण्यासाठी ट्रॅव्हल्स बसमध्ये चढल्या. यावेळी त्यांच्यामागे 5-6 महिला ही होत्या. बसमध्ये चढताना महिला चोरांनी त्यांच्या पर्सची चेन उघडून 50 हजार रुपयांची रोकड चोरी केली. काही अंतरावर जाताच महिला चोरांच्या टोळीने बस थांबवायला लावली आणि उतरल्या. तिकिटासाठी पैसे काढताना संगीता यांना पैसे चोरी झाल्याचे समजले आणि त्यांनी पोलिसात तक्रार केली.

दुसरी घटना सीताबर्डी ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी मातोश्रीनगर, वानाडोंगरी निवासी रेखा सुधीर भोयर (45) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. रेखा सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास मोरभवन बसस्थानकावरून बसमध्ये बसल्या. तिकिटाचे पैसे काढण्यासाठी बॅग बघितली असता त्यातील लहान पर्स गायब होती. त्यांच्या पर्समध्ये 44,250 रुपये किंमतीचे दागिने होते.

तिसरी घटना पारडीमध्ये घडली. पोलिसांनी गोरेगाव, गोंदिया निवासी वंदना प्रभाकर लांजेवार (45) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. वंदना मौदावरून एसटी बसमध्ये बसून जुन्या पारडी नाका चौकात आल्या. बसमधून उतरल्यानंतर बॅग तपासली असता सोन्याचे दागिने व रोख 19,050 रुपयांसह 1.37 लाख रुपयांचा माल गायब होता. त्यांनी पारडी ठाण्यात तक्रार दाखल केली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear of woman thieves in Nagpur