विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी... हे होते कारण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

लकी हा मित्रांना आपल्याविषयी उलटसुलट माहिती देत असल्याचे फैजानचे म्हणणे होते. फैजानच्या तक्रारीनुसार, लकी आणि त्याच्या पाच ते 6 मित्रांनी शिवीगाळ करून भांडण केले.

नागपूर : एकत्र महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात शस्त्रांचाही वापर झाल्याने दोघे जखमी झाले. गुरुवारी दुपारी आयकर भवनसमोर हा थरारक घटनाक्रम घडला. दोन्ही गटांकडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

गंगावन प्लाझा, नारी रोड, कपिलनगर रहिवासी फैजान याकूब शेख (19) आणि लक्ष्य ऊर्फ लकी तुरकेल (19, रा. मरियमनगर, सीताबर्डी) हे दोघे एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. यामुळे त्यांची आपसांत मैत्री होती. त्यांचा "फ्रेंड सर्कल'ही सारखाच होता. गुरुवारी दुपारी त्यांची सिव्हिल लाइन्स, आयकरभवनजवळील टपरीसमोर भेट झाली. दोघेही आपापल्या मित्रांसोबत तिथे आले होते. 

*बलात्कार... तिने घेतले उंदीर मारायचे औषध*
 

प्रारंभिक चर्चेनंतर त्यांच्यात वाद उफाळून आला. लकी हा मित्रांना आपल्याविषयी उलटसुलट माहिती देत असल्याचे फैजानचे म्हणणे होते. फैजानच्या तक्रारीनुसार, लकी आणि त्याच्या पाच ते 6 मित्रांनी शिवीगाळ करून भांडण केले. फैजानचा मित्र शशांक समुंद्रे व अन्य भांडण सोडविण्यासाठी गेले असता, समुंद्रेच्या माथ्यावर मारून जखमी करण्यात आले. 

लकीच्या तक्रारीनुसार फैजान आपल्या 5 ते 6 मित्रांसोबत आला होता. त्याने भांडण उकरून काढले. लकीचा भाऊ शशांक हा भांडण सोडविण्यासाठी गेले असता फैजानने जवळचा चाकू काढून शशांकच्या कमरेवर वार करून जखमी केले. दोन्ही गटांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी गुन्हे दाखल करीत तपास सुरू केला आहे. 
 

डिलेव्हरी बॉयकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न

 नागपूर : स्वीगी कंपनीच्या डिलेव्हरी बॉयला गुप्तीचा धाक दाखवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला. गुरुवारी रात्री रेशीमबाग येथे ही घटना घडली. सक्करदरा पोलिसांनी घटनेनंतर थोड्याच वेळात कुख्यात गुंडाला या प्रकरणात अटक केली. महेंद्र जांभूळकर (28, रा. सिरसपेठ, बुद्धविहाराजवळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो गुंडप्रवृत्तीचा असून लुटपाटीचे गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याची माहिती आहे. पार्वतीनगर, रामेश्‍वरी येथील रहिवासी मनोज पारधी (40) स्वीगी कंपनीचे डिलेव्हरी बॉय म्हणून काम करतात. गुरुवारी रात्री 11.45 वाजताच्या सुमारास ते ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी दुचाकीने जात होते. रेशीमबाग परिसरात आरोपीने त्यांना अडवून घेतले. गुप्ती छातीला लावली. "तुझ्या खिशात असतील ते पैसे मला दे, नाही तर मर्डर करीन', अशी धमकी दिली. मनोजने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली आणि थेट सक्करदरा ठाणे गाठले. मनोजच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी खंडणीखोरी व भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fighting in two groups of students