बलात्कार... तिने घेतले उंदीर मारायचे औषध

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 December 2019

अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी परत येत होती. यावेळी दुचाकीवर एक तरुण आला. रस्त्यात कुणीही नसल्याची संधी साधून मुलीला बळजबरीने दुचाकीवर बसवले आणि स्वत:च्या घरी घेऊन गेला. तेथे बळजवरीने बलात्कार केल्यानंतर मुलीला सोडून दिले. तसेच कुणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर मुलीने...

तिवसा (अमरावती) : शाळा व महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थिनींना आकर्षित करून विविध प्रकारचे आमिषे दाखविले जाते. प्रेमजाळ्यात येताच शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातात. दोन वर्षांपासून ते सात वर्षांपर्यंतच्या अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्या मुलीचाही अशाच पद्धतीने घात झाला आहे. अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्‍यात उघडकीस आली आहे. या घटना का घडत आहेत, त्यामागील कारणांचे आत्मचिंतन करणे आता क्रमप्राप्त झाले आहे. 

महिला अत्याचाराच्या घटनांत सातत्याने वाढ होणे, ही चिंतेची बाब आहे. अल्पवयीन, तरुणी, विवाहित महिला इतकेच नव्हे तर अगदी चिमुकल्या मुलीवर अत्याचार करण्यापर्यंत नराधमांनी मजल गाठली आहे. हैदराबाद येथे काही तरुणांनी डॉक्‍टर तरुणीवर अत्याचार करून खून केला. या घटनेने देश ढवळून निघाला होता. मित्र म्हणूनही विश्‍वासाचे नाते निर्माण करणाऱ्यांकडून संधी साधून अत्याचार केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. काहींनी तर वडील, काका, मामा, भाऊ या पवित्र नात्यालाच कलंक फासला आहे.

ताजी बातमी - भरधाव दुचाकी धडकली अन्‌ झाले अघटित

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्‍यातील मोझरी राष्ट्रसंतांच्या कर्मभूमीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. अल्पवयीन मुलीवर 20 वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची घटना 26 डिसेंबरला उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश वडतकर (वय 20 रा. मोझरी) या तरुणाने गावातील अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. 

अल्पवयीन मुलगी नियमितपणे शाळेतून घरी परत जात असताना ऋषिकेशने पाठलाग करीत रस्त्यात कोणी नसल्याचे पाहून बळजबरीने दुचाकीवर बसून स्वतःच्या घरी नेले व बलात्कार केला. मुलीने बदनामीच्या भीतीने उंदीर मारायचे औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आरोपी ऋषिकेश वडतकर याच्या विरोधात 363, 366, 376, (1), 506, 4, 12. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पीएसआय वर्षा वंजारी करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rape in Amravati's Tiwasa taluka